पसंतीने केलेला विवाह कुणीही रोखू शकत नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : लग्न हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. कुणी कुणाशी लग्न करायचं, हा खासगी आणि व्यक्तीगत निर्णय असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. याबाबतच न्यायलयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. सज्ञान व्यक्ती आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत लग्न करण्यास इच्छुक असेल, तर तिला कुणीही रोखू शकत नाही, असं कोलकाता उच्च न्यायालायनं म्हटलंय. एका प्रकरणी निकाल देताना कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अनेकदा प्रेमविवाह करताना कौटुंबीक विरोधाला अनेकांना सामोरं जावं लागतं. त्या पार्श्वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलाय.
हेही वाचा – राष्ट्रपती सपत्नीक लग्नाला येणार असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, त्याचं झालं असं…
कोर्टानं काय म्हटलंय?
सज्ञान व्यक्तीनं तिच्या पसंतीनं विवाह केला आणि त्यासाठी तिनं स्वतःहून धर्मांतर केलं असेल तर तिला कुणीही रोखू शकत नाही, असं मत कोलकाता उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय.
न्यायधीश संजीव बॅनर्जी आणि न्यायाधीश अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात हा निर्णय दिलाय. आपल्या 19 वर्ष वयाच्या मुलीला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप मुलीच्या पित्यानं याचिकेतून केला होता. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला कोर्टासमोर हजर केलं होतं. यामध्ये मुलीलं आपल्या मर्जीनं विवाह केल्याचा जबाब दिला होता. आपल्यावर कुणीही जबरदस्ती केली नव्हती असा जबाब या मुलीनं नोंदवला होता. त्यानंतर कोर्टानं हे महत्त्वाचं विधान केलंय. पसंतीनं केलेला विवाह कुणीही रोखू शकत नाही, असं कोर्टानं याप्रकरणी सुनावणी देताना म्हटलंय.