हिंदू धर्म सोडून ‘ते’ झाले बौद्ध!

वाल्मिकी समाजातील 236 जणांचं स्वेच्छेनं धर्मांतर

Goan Varta Live | प्रतिनिधी

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनेचे तीव्र सामाजिक पडसाद उत्तर प्रदेशात पाहायला मिळत आहेत. गाझियाबादमधल्या करहेडामधल्या हिंदू वाल्मिकी समाजातल्या 50 कुटुंबांनी धर्मांतर केले आहे. एकूण 236 जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

दुर्लक्ष होत असल्यामुळेच…

बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. हाथरस प्रकरणामुळे अतिशय दु:ख झाल्याची भावना बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या वाल्किमी कुटुंबांनी व्यक्त केली. ‘आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केले जात आहे. आर्थिक विवंचनेचा सामना करत असूनही प्रकरणांची सुनावणी घेतली जात नाही,’ अशी व्यथा बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या कुटुंबीयांनी मांडली. या कुटुंबांना भारतीय बौद्ध महासभेकडून एक प्रमाणपत्र देण्यात आले.

समाजसेवा करण्याचा संदेश

आमच्या गावातल्या 50 कुटुंबांमधल्या 236 जणांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याचे बीर सिंह यांनी सांगितले. ‘बौद्ध धर्म स्वीकारण्यांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. त्यांनी यासाठी कोणतेही शुल्क घेतलेले नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाजसेवा करा, असे त्यांनी सांगितले,’ अशी माहिती सिंह यांनी दिली.

सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर होते अस्वस्थ

14 सप्टेंबरला हाथरसमधील बुलगढी गावातल्या वाल्मिकी समाजाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीची जीभही कापून टाकण्यात आली. रुग्णालयात कित्येक दिवस पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. यानंतर वाल्मिकी समाजात आक्रोश पाहायला मिळाला. सध्या सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!