त्रास देणं हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा होत नाही

सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: अलीकडच्या काळात होणाऱ्या आत्महत्या हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. घरगुती हिंसाचाराला कंटाळून कधी महिला आत्महत्या करतात, तर कधी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात, कधी प्रेमप्रकरणातून तरूण तरूणीच्या आत्महत्या होतात, तर कधी वरिष्ठानी अपमान केला म्हणून कर्मचारी आत्महत्या करतात, कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आणि उद्योगपती यांच्या आत्महत्या यांच्या बातम्या नेहमीच येत असतात. अशातच बायको घर सोडून गेली आणि तिचे आईवडिल तिला माघारी पाठवत नाहीत म्हणून पतीने आत्महत्या केली. तसंच सूसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी पत्नी तसंच तिच्या आईवडिलांना जबाबदार धरलं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालया पोहोचलं असता सर्वोच्च न्यायालयाने आगळा वेगळा निर्णय दिलाय.

हेही वाचाः RAIN UPDATE | पावसाने गाठली नव्वदी

त्रास देणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हो नाही

एखाद्याने केवळ त्रास दिला हा आरोप करून आत्महत्या केली तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा होत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्या. नागेश्वर राव आणि अनिरुद्ध बोस यांनी दिला आहे. ३०६ आयपीसीचा गुन्हा होण्यासाठी आरोपींनी आत्महत्येत सक्रिय भूमिका असली पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा व्यक्त केलं आहे.

हेही वाचाः डिचोली भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत चणेकर

१० सप्टेंबर २०१४ मधील प्रकरण

१० सप्टेंबर २०१४ रोजी रोशनबी ही आपला पती फेरोजखान याचं घर सोडून वडिलांकडे निघून गेली. ३० सप्टेंबर २०१४ मध्ये फेरोजखानने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या ४ सुसाईड नोटमध्ये रोशनबीला तिचे आई – वडील परत पाठवत नाहीत, त्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचं नमूद केलं आणि आत्महत्येसाठी तिच्यासह आई – वडील जबाबदार असल्याचं लिहिलं होतं. फेरोजखानच्या भावाच्या तक्रारीवरून रोशनबी आणि तिच्या कुटुंबातील २ जणांविरुद्ध ३०६ आयपीसी (आत्महत्येस प्रवृत्त करणे) चा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दोषारोपपत्र पाठविल्यानंतर आरोप निश्चिती होऊन न्यायालयात खटला सुरू झाला. हा खटला रद्द व्हावा म्हणून रोशनबीने मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मान्य होऊन खटला रद्द ठरविण्यात आला. फेरोजखानच्या भावाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं. हे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं.

हेही वाचाः जनसेवा हीच नारायण सेवा: सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य

सर्वोच्च न्यायालयाचे मत

३०६ आयपीसीचा गुन्हा होण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात किंवा आत्महत्येस सहाय्य करण्यात आरोपीचा सक्रिय सहभाग असला पाहिजे.

आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी सक्रिय भूमिका नसताना केवळ त्रास दिला यावरुन ३०६ आयपीसीचा गुन्हा होत नाही.

हेही वाचाः काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव आज गोव्यात

अपिलातील मुद्दे

सुसाईड नोटवरून प्रथमदर्शनी गुन्हा निष्णन होतो.

सुसाईड नोटप्रमाणे रोशनबी आणि तिच्या आई – वडिलांनी त्रास दिल्यामुळेच फेरोजने आत्महत्या केली म्हणजेच त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं.

त्रास देणं हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही.

हेही वाचाः कांदोळीत ‘सीआरझेड’मधील बांधकामं पाडली

मात्र कायद्याने अशी व्यक्ती आत्महत्येस जबाबदार असतेच असं नाही

अनेक वेळा अशा आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या करताना किंवा त्यापूर्वी नजीकच्या काळात लिहिलेल्या, बोललेल्या किंवा वर्तनाने स्पष्ट होणाऱ्या गोष्टीतून जर कोणी अन्य व्यक्तीने आत्महत्या करण्यास भाग पाडलं असेल, तर अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. सर्वसाधारण समजूत अशी असते की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याला काही कारण झालं असेल तर ते कारण निर्माण करणारी व्यक्ती अशा आत्महत्येस जबाबदार आहे. एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाशी वागताना असं काही केलं की ते सहन न झाल्याने त्या माणसाने आत्महत्या केली, तर कित्येक वेळा समाजात त्याला जबाबदार धरलं जातं. मात्र कायद्याने अशी व्यक्ती आत्महत्येस जबाबदार असतेच असं नाही.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | भाजपला घेरण्यासाठी गोवा फॉरवर्ड सक्रिय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!