८ वर्ष जुनी गाडी वापरत असाल तर ही बातमी वाचाच!

लवकरच तुमच्या गाडीला ग्रीन टॅक्सही

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे कार असेल आणि त्या कारला आठपेक्षा जास्त वर्ष झाली असतील, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यापुढे ८ वर्ष जुन्या कारवर ग्रीन टॅक्स आकारला जाणार आहे. त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यताय. नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दरम्यान, हा टॅक्स नेमका किती असणार आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळी फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी जातील त्यावेळी त्यांना हा कर भरावा लागणार आहे. तसेच १५ वर्षे झाल्यानंतर नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी जाणाऱ्या खासगी कारना नूतनीकरण करुन घेताना ग्रीन टॅक्स भरावा लागेल.

ज्या शहरात प्रदूषण जास्त आहे त्या शहरात जास्त ग्रीन टॅक्स आकारला जाणार आहे. प्रत्येक राज्यात रोड टॅक्सच्या १० ते २५ टक्के या प्रमाणात ग्रीन टॅक्स लावला जाण्याची शक्यताय. मात्र ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर आहे, त्या शहरांमध्ये रोड टॅक्सच्या 50 टक्के प्रमाणात ग्रीन टॅक्स लागणार आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. ग्रीन टॅक्स संदर्भातला प्रस्ताव केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाठवला आहे. राज्य सरकारांकडून ग्रीन टॅक्स या विषयावर आलेल्या मतांचा विचार केल्यानंतर ग्रीन टॅक्सबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी अधिसूचना काढली जाणार आहे.

बस सारख्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना तुलनेनं कमी ग्रीन टॅक्स लागू होणार आहे. बॅटरीवर चालणारी वाहने, सीएनजी, इथेनॉल, एलपीजी यांचा वापर करुन चालवली जाणारी वाहने यांना ग्रीन टॅक्समधून सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर, हार्वेस्टर, टिलर अशा वाहनांनाही ग्रीन टॅक्समधून सवलत दिली जाणार आहे.

ग्रीन टॅक्समधून मिळालेली रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवली जाईल. या रकमेतून वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांना आळा घालण्यासाठी उपाय केले जातील. तसेच या रकमेतून निश्चित असा वाटा राज्यांना दिला जाईल. या निधीचा वापर करुन राज्यांना आपापल्या क्षेत्रात प्रदूषणाची मोजणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रणा बसवावी लागेल. देशात 1 एप्रिल 2022 पासून ग्रीन टॅक्स लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. यामुळे ग्रीन टॅक्सची अधिसूचना निघाल्यानंतर कायदा लागू होण्याआधी जुनी वाहने वापरणाऱ्यांना पर्याय शोधण्याची एक संधी मिळेल.

महत्त्वाचं –

देशातील एकूण वाहनांपैकी 5 टक्के वाहने खासगी

त्यातून ६५ ते ७० टक्के प्रदूषण होतं.

जुन्या वाहनांचे तंत्रज्ञान जुने असल्यानं आधुनिक वाहनांच्या तुलनेत प्रदूषण जास्त.

देशातील २००० पूर्वीच्या वाहनांची संख्या जेमतेम १ टक्का

या वाहनांमुळे १५ टक्के वायू प्रदूषण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!