सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर

मंगळवारी सोन्याच्या भावात साधारण 170 रुपयांची घसरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीत एका विशिष्ट मर्यादेत चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव हे 47 हजारांच्या उंबरठ्यावर अडकून पडले आहेत. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर 22 कॅरेटच्या प्रतितोळा सोन्याची किंमत 46,160 रुपये इतकी नोंदवण्यात आली. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,160 रुपये इतका आहे. सोमवारी सोन्याचा भाव 116 रुपयांनी आणि चांदीचा भाव 161 रुपयांनी वधारला होता. बाजार बंद होताना सोन्याचा प्रतितोळा दर 46,337 रुपये इतका नोंदवण्यात आला होता. या तुलनेत आज सोन्याच्या भावात साधारण 170 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचाः पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

सोन्याचा भाव अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर

गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात अनेक चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज बाजारपेठेत सोन्याच्या दरात 86 रुपयांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 46956 रुपये इतका झाला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. 14 एप्रिल रोजी एमसीएक्स वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा 46831 रुपये इतका होता. तर 15 एप्रिलला हाच दर प्रतितोळा 47401 रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

हेही वाचाः सेंद्रिय कृषीविषयक प्रशिक्षण दिलेले किमान 500 शेतकरी दाखवाच

हॉलमार्किंगच्या अंमलबजावणीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचं चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता गोल्ड हॉलमार्किंगची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!