पावसात जलसमाधी घेतलेल्या कारच्या बदल्यात मालकाला मिळाली दारात नवी कोरी कार

13 जून 2021 ची घाटकोपरमधील घटना; सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये अचानक खड्डा पडून कार पाण्यात बुडाली होती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: गेल्या महिन्यात पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढलं होतं. अशातच घाटकोपरमध्ये एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये अचानक खड्डा पडला आणि कार पाण्यात बुडाली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेवर बरेच मिम्स आणि जोक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान कार मालकाला बजाज अलाएन्सनं नवी कोरी कार भेट दिली आहे.

हेही वाचाः नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईचं गोव्यात आगमन

डॉ. किरण दोषी असं या कार मालकाचं नाव आहे. यासंबंधी एक जाहिरातही कंपनीनं केली आहे. नवी कोरी कार मिळाल्यानंतर किरण दोषी म्हणाले की, कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितलं. त्या कार डिलरला कंपनीच्या वतीने कार पुरवण्यात आल्याचं दोषी सांगतात.

हेही वाचाः लस घ्या; अन्यथा आठवड्याला कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवा

नेमकं काय घडलं होतं

घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या आवारात ही घटना घडली होती. सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली. तब्बल 12 तासानंतर या ठिकाणी 40 फूट खोल पडलेली ही कार बाहेर काढण्यास अखेर यश आलं होतं.

पालिकेनं दिलं होतं स्पष्टीकरण

कार पाण्यात बुडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबई मनपाने म्हटलं, कारच्या या घटनेशी महापालिकेचा दूरान्वयानेही संबंध नाही. ही घाटकोपर भागातील खासगी सोसायटीतील घटना आहे. घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आलं आहे की, सदर व्हिडिओतील घटना 13 जून 2021 रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!