सामूहिक बलात्कार : पीडित युवतीचा अखेर मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बालात्कार पीडित दलित तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी चार सवर्ण तरुणांनी बलात्कार करुन तिची जीभ छाटली. नंतर तिची मान मोडल्याचा अमानुष प्रकार घडला होता. या तरुणीची 14 सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर तिची प्राणज्योत मालवली. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.
तरुणीच्या मृत्यूपूर्वी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, 14 सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळली, तेव्हा तिची जीभ छाटलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.
आठ दिवसांनंतर जोडले सामूहिक बलात्काराचे कलाम
पीडित तरुणीने (19) सवर्ण समाजातील चार तरुणांनी अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 23 तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले.
सवर्ण समाजातील तरुण देत होते त्रास
या मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की, “त्यांच्या घराजवळ राहणारा २० वर्षीय सवर्ण समाजातील तरुण आणि त्याचे काही नातेवाईक कायम या भागातील दलित समाजातील व्यक्तींना त्रास देत असतात.” पीडित मुलगी ज्या गावामध्ये राहते, त्या गावात 600 कुटुंबांपैकी केवळ 15 दलित कुटुंब आहेत. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता. त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.