फ्रान्सने सोपवली राफेलची दुसरी तुकडी

चीनला लागून असलेल्या पूर्वेकडील सीमेचे करणार संरक्षण. विमाने भारतात कधी आणायची ते भारतीय हवाई दलावर अवलंबून.

महेश दिवेकर | प्रतिनिधी

पॅरिस : फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांची आणखी एक तुकडी भारताकडे सोपवली आहे. या तुकडीतील 5 लढाऊ विमाने सध्या फ्रान्समध्येच आहेत. ही राफेल विमाने ऑक्टोबरमध्ये भारतात दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे. या विमानांना पश्चिम बंगालमधील कलईकुंडा हवाई दलाच्या तळावर तैनात केले जाणार आहे. ही विमाने चीनला लागून असलेल्या पूर्वेकडील सीमेचे संरक्षण करतील. राफेलच्या पहिल्या तुकडीतील 5 विमाने 10 सप्टेंबरला एका औपचारिक कार्यक्रमात भारतीय हवाई दलात दाखल झाली आहेत.

राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारताला सोपवण्यात आली आहे. ही विमाने सध्या फ्रान्समध्ये आहेत. ही विमाने भारतात कधी आणायची ते आता भारतीय हवाई दलावर अवलंबून आहे. भारत-चीनमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या विमानात भारताने आपल्या दृष्टीने काही बदल केले आहेत. यामुळे हे विमान कमी तापमानातसुद्धा सहजपणे सुरू होऊ शकते. पहिल्या तुकडीत भारतात दाखल झालेल्या 5 राफेल विमानांची 250 तासांहून अधिक उड्डाणं आणि फिल्ड फायरिंगच्या चाचण्या घेण्यात आल्या. अंबाला येथील 17 गोल्डन अ‍ॅरो पथकांमध्ये या विमानांचा समावेश करण्यात आला आहे.

फ्रान्सबरोबर भारताने 36 राफेल विमाने खरेदीचा करार केला आहे. 36 पैकी 30 विमाने लढाऊ असतील, तर 6 प्रशिक्षण विमाने असतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.