माजी अप्पर पोलीस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे यांचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मानास पात्र ठरलेले निवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे (वय ८७) यांचं बुधवारी हैदराबाद येथे निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असं कुटुंब आहे.

बहुआयामी व्यक्तीमत्व

खटाव तालुत्यातील जयराम स्वामींचे वडगाव हे मूळ गाव असलेले रावसाहेब घार्गे हे सर्वत्र काका म्हणून परिचित होते. कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय पोलीस अधिकारी असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले काका यांचा जन्म २५ जुलै १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पोलीस दलात अधिकारी पदावर १९५९ ते १९९२ अशी ३३ वर्षं सेवा बजावली व अप्पर पोलीस अधीक्षक या प्रतिष्ठेच्या पदावरून सन्मानाने निवृत्त झाले.

शैक्षणित क्षेत्रातील कार्य

सेवानिवृत्तीनंतर ते २७ वर्षं हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष होते. १९६६ साली त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सहकार्यांसमवेत हुतात्मा मंडळाची स्थापना करून जयराम स्वामींचं वडगावचा शैक्षणित क्षेत्रात नावलौकिक वाढवण्याचं कार्य साधलं. जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे ते प्रमुख मार्गदर्शक राहिले. त्यांनी या विद्यालयाला देणग्या मिळवून दिल्या. वैयक्तिक तसंच मुलासुनांच्या सहाय्यानं भरीव आर्थिक योगदान देत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असून त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात मोलाचं योगदान दिलंय. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजकार्यात सक्रिय राहिले. त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना २०१५ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.