जेडीयूची ‘गुप्त’ खेळी! गुप्तेश्वर पांडेंची नितीश कुमारांशी हातमिळवणी

बिहारमध्ये गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय खेळीची चर्चा जोरात

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

बिहार : बिहार राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केल्या. जदयूचे प्रमुख नितीश कुमारांच्या उपस्थितीत त्यांनी जदयूत प्रवेश केलाय. पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर राजकीय वर्तुळात गुप्तेश्वर पांडे आता भाजपात प्रवेश करणार, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. भाजपामध्ये प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढवतील, असंही बोललं जातं होतं.

मात्र गुप्तेश्वर पांडे यांनी भाजपामध्ये प्रवेश न करता जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश करत नितीश कुमारांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे अनेक राजकीय जाणकारांनाही धक्का बसला आहे. सध्या बिहारमध्ये गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय खेळीची चर्चा जोरात सुरु आहे. याआधी गुप्तेश्वर पांडे यांनी 2009 सालीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र भाजपाने त्यांनी तेव्हा उमेदवारी दिली नाही.

अखेरीस त्यांनी आपली स्वेच्छा निवृत्ती मागे घेतली आणि ते पुन्हा पोलिस दलात दाखल झाले. आता पुन्हा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. जेडीयू आता गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी देते का, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय.

जेडीयूप्रवेशानंतर गुप्तेश्वर पांडे म्हणाले…

मला मुख्यमंत्र्यांनी स्वतः पक्षात येण्याचं आवाहन केलेलं. ते मला जे सांगतील ते मी करेन. राजकारण मला कळत नाही. मी सामान्य माणूस आहे. समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यात मी आतापर्यंत वेळ घालवला आहे.

कोण आहेत गुप्तेश्वर पांडे?

  • 1987 बॅचचे आयपीएस
  • 2019मध्ये बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून रुजू
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!