FIRE | हॉस्पिटल ऑन फायर; मुंबईत कोविड रुग्णालयांमध्ये अग्नितांडव सुरूच

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात आग, १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्रात मृत्यू तांडव काही थांबेना! दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आता वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 9 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असल्याचं समजतंय. याचसंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत सोमय्या यांनी सध्याची परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेऊन केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे. तसंच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केलीय.

आगीचं नेमकं कारण काय?

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किंटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय या हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिट देखील झालं नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत अद्याप विरार महापालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच अग्निशमन दलाकडून आगीचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात येईल. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारीदेखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त करत हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप तरी प्रशासनाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

या आगीची माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी आगीचं स्वरुप अत्यंत भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना ती विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही आग अटोक्यात आली. पण दुर्दैवाने या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, इतर 5 ते 6 रुग्णांना वाचविण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

इतर रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं

रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

फडणवीस म्हणतात…

देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन विरारमधील घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलीय. “आणखीन एक धक्कादायक घटना. विरारमधील कोव्हिड रुग्णालयामधील आयसीयूला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समल्याने खूप दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी असून यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त

पंतप्रधान मोदींनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. “विरारमधील रुग्णालयामध्ये आग लागण्याची घटना दु:खद आहे. आपल्या नातेवाईकांना गमवलेल्यांचं मी सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी इच्छा व्यक्त करतो,” असं मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर

या संदर्बात पंतप्रधान कार्यालयामार्फत ट्विट करण्यात आलंय. यामध्ये रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची, तर जखमींच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असं ट्विट पीएमओच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!