ट्विटरविरोधात गुन्हा; चुकीची माहिती दिल्याचा आरोप

ट्विटर वापरण्यास मुलांना अटकाव करा; राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची केंद्राला विनंती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पोक्सो कायद्याअंतर्गत ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांसंदर्भात चुकीची माहिती दिली असून पोक्सो कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे(NCPCR) अध्यक्षांनी ट्विटरविरोधात दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. लहान मुलांसाठी ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरक्षित नाही. जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत लहान मुलांना ट्विटर वापरण्याची परवानगी देऊ नये, असं पत्र केंद्राला लिहिल्याचं राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे(NCPCR) अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सांगितलं आहे.

हेही वाचाः चक्रीवादळात घरांचे नुकसान

ट्विटर कंपनीकडून पॉक्सो कायद्याचं उल्लंघन

बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबतचं साहित्य उपलब्ध असणाऱ्या आणि जिथून त्याची विक्री होते, अशा व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक ट्विटरवर उपलब्ध आहेत, असा दावा बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी केला आहे. याशिवाय, लहान बालकांवर बलात्कार करण्याची धमकीही ट्विटरवरून दिल्याची उदाहरणे घडली आहेत. अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांची माहिती ट्विटर कंपनीनं भारतीय अधिकाऱ्यांना देणं आवश्यक असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. ट्विटर कंपनीनं पॉक्सो कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप कानुनगो यांनी केला आहे.

हेही वाचाः ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ औषधाच्या अतिरिक्त 30,100 कुप्या राज्यांना वितरीत

ट्विटरविरुद्ध गुन्हा दाखल

प्रियांक कानूनगो म्हणाले की, डार्क वेब आणि डीप वेब यासारख्या इंटरनेटच्या घातक जगात जाण्याच्या अनेक लिंक्स ट्विटरवर उपलब्ध आहेत. या लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. यासंदर्भात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने(NCPCR) ट्विटरला समन्स पाठवत माहिती मागवली होती. मात्र, ट्विटरने आयोगाला चुकीची माहिती पुरवली. ट्विटरनं पॉक्सो कायद्याच्या नियम 11,15,19 चं उल्लंघन केलं आहे. तसेच IPC कलम 199 चेही उल्लंघन केलं आहे. त्यामुळेच दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. मंगळवारी ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!