सर्व वाहनांवर फास्टॅग बंधनकारक, पण, कधीपासून? वाचा…

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरातील टोल नाक्यांवर डिजिटल आणि आयटी पेमेंटना चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व वाहनांवर फास्टॅग (FASTAG) बंधनकारक केले आहेत.

देशात 1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक असल्याची घोषणा गडकरींनी केली आहे. फास्टॅगमुळे आता रोख रक्कमेने टोल भरावा लागणार नाही व यामुळे टोल नाक्यावर होणाऱ्या गर्दीपासून देखील वाहनचालकांची सुटका होईल. याआधी फास्टॅगवर काही प्रमाणात सूट होती. मात्र आता 1 जानेवारीपासून सर्व वाहनांसाठी अनिवार्य असेल.

2016 पासून टोल वसुलीसाठी वाहनांवर फास्टॅग लावण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर 2020मध्ये रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग बंधनकारक करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

22 राष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय

फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे. या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल. यावेळी बँकेचं खातं जोडताना केवायसी असणं आवश्यक आहे. बँकेत जाताना तुमच्या वाहनाची आरसी तुमच्यासोबत ठेवा. Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही FasTag काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसं करायचं?

जर तुम्ही FASTAG बँक खात्यासोबत लिंक केलं असेल, तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही. तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल. तुमच्या फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता. पण या सेवेसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतील. महत्वाचं म्हणजे एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!