शेतातला बळीराजा रस्त्यावर

शेतकर्‍यांनां विविध पक्षांचा पाठिंबा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. मंगळवारी शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पक्षासह देशातील सर्व विरोधी पक्षांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

राजकिय पक्षांचा पाठिंबा

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ ११ विरोधी पक्षांनी निवेदन जारी केले आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, पीएजीडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), आरएसपी, आरजेडी, द्रमुक आणि एआयएफबी यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याची तसेच कृषी कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला आणि त्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आमचा पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षांनी या निवेदनात म्हटले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९ डिसेंबरला रात्री ९ वाजता राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे.

भारत बंद घोषणा

शेतकरी नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ८ डिसेंबरला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भारत बंद पुकारण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम असेल. रुग्णवाहिका आणि लग्न समारंभासाठी रस्ते खुले असतील. सर्वच ठिकाणी शांततेत निदर्शने करण्यात येतील. चंदिगडमध्ये ७ तारखेला मोठे आंदोलन केले जाईल, असे शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!