देशात कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

दोन डोसच्या पूर्ण लसीकरणाला प्राधान्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. या महामारीला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसहे एकमेव मोठं शस्त्र मानलं जात आहे. देशात सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे आणि या दरम्यान अनेक देशांनी कोविड -19 विरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस भारतात कधी दिला जाईल, असा हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं की, दोन डोसच्या पूर्ण लसीकरणाला प्राधान्य आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे की, देशाची प्राधान्यता कोरोना लसीचे दोन्ही डोस सर्व लोकांना देणं आहे आणि ते चालूच राहील. या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रत्येकाचं लसीकरण पूर्ण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे.

कोविड -19 वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ब्रीफिंग दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवा चर्चेत यावेळी बूस्टर डोस हा मुख्य विषय नाही आहे. सध्या दोन डोससह पूर्णपणे लसीकरण हे मुख्य प्राधान्य आहे.

देशभरात लसीचे 77.25 कोटी डोस

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 डोस देण्यात आले आहेत. देशभरातील 58 कोटी 26 लाख 6 हजार 905 लोकांनी एक डोस घेतला आहे. तर 18 कोटी 98 लाख 18 हजार 839 लोकांना दोन्ही डोस देण्यात आलेत.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, यूके, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, सौदी अरेबिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि स्वित्झर्लंड या सर्व देशांमध्ये मिळून एका दिवसात जेवढं लसीकरण होतं, त्यापेक्षा जास्त लसीकरण भारतात एका दिवसात होत आहे.

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!