कोकण रेल्वे विद्युतीकरण मे अखेरपर्यंत पूर्णत्वास

इंधनावरील 100 कोटींची होणार बचत : बबन घाटे

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या इंधनावर होणाऱ्या खर्चापैकी 100 कोटींची बचत होईल, अशी माहिती कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाचे महाप्रबंधक बबन घाटगे यांनी दिली.

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र करोना संकटामुळे काम लांबणीवर पडले. आता या कामाला रेल्वे प्रशासनाने वेग दिला आहे. महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील थोकूर या रेल्वे स्थानकापर्यंतच्या कोकण रेल्वेच्या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. मध्य रेल्वेकडून रोहाच्या पुढील भागात तसेच थोकूरपासून पुढील भागातील विद्युतीकरण करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने विद्युतीकरणाच्या कामासाठी दोन ठेकेदार नेमले आहेत. पूर्ण महाराष्ट्र ते वेर्णा या मार्गाचे काम एका ठेकेदाराकडून तर , वेर्णा ते थोकूरपर्यंतचे काम दुसऱ्या ठेकेदाराकडून सुरू आहे.

विद्युतीकरणामुळे पर्यावरणाचे रक्षण!

विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून इंधनासाठी खर्च केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनामुळे प्रदूषण होते. त्यामुळे रेल्वे विजेवर सुरू झाल्यानंतर प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. याशिवाय रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे दरवर्षी इंधनावर खर्च होणारे सुमारे 100 कोटी रुपये वाचणार आहेत, अशी माहितीही बबन घाटगे यांनी दिली.

थोकूर – बिजूर मार्गाला हिरवा कंदील

कर्नाटकातील थोकूर ते बिजूर या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या मार्गावर पाहणी करून विद्युतीकरणाची चाचणीही घेण्यात आलेली आहे. त्यानंतर आयोगाकडून विजेवर रेल्वे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरीपर्यंतच्या मार्गावरील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे . रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या मार्गावरही चाचणी घेण्यात आली आहे . उर्वरित कोकण रेल्वेच्या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे.

सुशोभिकरण व पायाभूत सुविधांसाठी 25 कोटींचा निधी

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून मडगाव, थिवी, करमळी रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण व पायाभूत सुविधांसाठी 25 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. या निधीतील 12 कोटी रुपये मडगाव स्थानकाच्या विकासासाठी वापरले जात आहेत. यातून बहुमजली पार्किंग प्रकल्प व बस थांबाही उभारला जात आहे. पणजी, फोंडा आदी ठिकाणी जाणाऱ्या आणि स्थानिक बसेस त्या ठिकाणी असतील, असे बबन घाटगे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.