अखेर ठरलंच तर! खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार, ‘या’ दिवशी बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ

खडसेंच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला अखेरचा जय महाराष्ट्र करणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) राष्ट्रवादी प्रवेशावर मोठं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं एकनाथ खडसे भाजपसाठी काम करत होते. जळगावमध्ये त्यांनी भाजपचा किल्ला एकहाती लढवला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसेंची खदखद चर्चेचा विषय ठरली होती.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेटही चर्चेत आली होती. मागच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं प्रचंड अस्वस्थता जळगावातील भाजपच्या राजकाराणात पाहायला मिळाली होती. एकनाथ खडसे पुढे काय करणार, याबाबत राजकीय चर्चांनाही उधाण आलं होतं. अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार, असं एकनाथ खडसेंचं ठरलं असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. पत्रकार परिषद घेत जयंत पाटील (Jayant Patil, NCP Leader & Maharashtra Minister) यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब केलंय.

गेल्या काही दिवसांत खडसे राष्ट्रवादीमध्ये जाणार, अशा अफवांना ऊत आला होता. मात्र या अफवांचं वादळ अखेर शमलंय. येत्या शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जळगावात भाजपाल मोठा धक्का बसेल, असं बोललं जातंय. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!