विचित्र प्रकार! रात्री 3 वाजता कळलं की प्रवाशांना वाऱ्यावर सोडून बसचालक पळून गेला

अखेर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस पथक दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र प्रकार घडलाय. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाने प्रवाशांना आणि बसला जंगलभागात सोडून पळ काढला. सारे प्रवासी गाढ झोपेत असताना हा प्रकार केला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

रात्री 3 वाजता प्रकार उघडकीस

रात्री 3 वाजता एका प्रवाशाला जाग आली. त्याने गाडी का थांबलीय हे पाहण्यासाठी सीटवरून उठून पुढे जाऊन पाहिलं, तर तिथे ड्रायव्हर दिसला नाही. काही मिनिटं वाट पाहिली परंतू तो न आल्यानं त्या प्रवाशाने इतर प्रवाशांना उठविण्यास सुरुवात केली. त्यांना या प्रकाराची माहिती दिली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस पथक दाखल

बस चिपळूणमधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबविलेली असल्याने प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला. अखेर पहाटे सव्वाचारच्या सुमारास चिपळूण पोलिसांचं एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झालं. त्यानंतर बसचा मालक, त्यांचा बुकिंग एजंट यांचे फोन लावण्यास सुरुवात झाली. परंतू, त्यांच्यापैकी कोणाचेही फोन लागत नसल्यानं प्रवाशांना मदत मिळू शकली नव्हती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!