‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे दिपेश परब यांना ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग लाईव्हचे वेंगुर्ला करस्पाँँडंंट दिपेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झालाय.
ओरोस इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या सभेत जिल्ह्यातील विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 6 जानेवारी रोजी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.
दीपेश परब हे 2014 पासून पत्रकारितेमध्ये काम करत आहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील बातम्यां त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. महत्वपूर्ण विषयाला भिडून माहिती मिळवणं अशा एकूणच त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. यापूर्वी परब यांना वेंगुर्ला क्रीडा बहुविध परिषद, वेंगुर्ला तालुका क्रीडा समन्वयक समिती व रोटरी क्लब मिडटाऊन-वेंगुर्ला यांच्या वतीनं उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार म्हणून सन 2016 मध्ये सन्मानित करण्यात आलं होत. आता या जिल्हास्तरावरील पुरस्कारानं त्यांच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडलीय.
जाहीर झालेले अन्य पुरस्कार
जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पुरस्कार म्हणून दीपेश परब, आदर्श पुरस्कार-संदीप गावडे, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार-अनिकेत भोसले यांना घोषित करण्यात आले; तसेच ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य कै. अरविंद शिरसाट यांच्या स्मृत्यर्थ एक विशेष पुरस्कार यावेळी देण्याचे ठरले. यासाठी दोडामार्गच्या तेजस देसाई यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण 6 जानेवारीला ओरोस येथील श्री इच्छापूर्ती मंगल कार्यालय इथं सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.
या बैठकीस जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव उमेश तोरसकर, सहसचिव देवयानी वरसकर, नंदकिशोर महाजन, बंटी केनवडेकर, एकनाथ पवार, हरिश्चंद्र पवार, भरत सातोस्कर, निलेश तेंडुलकर, सुधीर राणे, आनंद लोके आदी उपस्थित होते.