कंगनाच्या घरावर हातोडा मारण्यासाठी बीएमसीला ग्रीन सिग्नल

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय. तिच्या वांद्रेतील घरवार हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. कंगनाच्या वांद्रेतील घरात वैध बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पालिकेनं दिलेल्या नोटिशीवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळे येत्या महिन्याभरात कंगनाच्या घरावर बीएमसी हातोडा चालवू शकते.
मुंबईतील दिंडोशी कोर्टाने अवैध बांधकामावर शिक्कामोर्तब केलंय. तसंच याचिकाकर्त्या कंगना रणौतला 6 आठवड्यांची मुदतसुद्धा देण्यात आली आहे. महापालिकेनंतर आता कोर्टानेही कंगनाच्या घरामध्ये अवैध बांधकामावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने दिलेला हा निर्णय कंगनासाठी धक्का मानला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण आहे 2018 सालचं. पालिकेनं कंगनाला तिच्या वांद्रेतील घरात अवैध बांधकाम झाल्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटीसविरोधात कंगनानं कोर्टाचा स्टे आणला होता. पण आता मुंबईतील दिंडोशी कोर्टाने हे बांधकाम अवैध असल्याचं मानलं आहे. तसंच येत्या दीड महिन्यानंतर तुम्ही ते तोडू शकता, असंही पालिकेला म्हटलं आहे.
मुंबईवर वादग्रस्त विधान केल्यानंतर कंगना चर्चेत आली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही तिनं केलेले ट्वीट सातत्यानं चर्चेत आले होते. दरम्यान, कंगना विरुद्ध राज्य सरकार आणि मुंबई महापालिका हा वाद रंगत आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग तोडला होता. त्यानंतर कंगनाने यंत्रणेवर खरमरीत टीका केली होती. तसंच एकेरी शब्दांत उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधल्यानंतर हा वाद अधिकच रंगत चालल्याचं पाहायला मिळतंय.