धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
धारवाड : शाळेतील जुन्या, गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी रियुनियनचा म्हणजेच पुन्हा एकदा मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा खास प्लॅन केला जातो. कित्येक वर्षांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद असल्याने भरपूर मजा, मस्ती आणि धमाल केली जाते. मात्र रियुनियन प्लॅनचा आनंद एका ग्रुपला उपभोगताच आला नाही. पिकनिकसाठी निघालेल्या बसवर काळाने घाला घातला. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात इट्टीगट्टी या ठिकाणानजीक शुक्रवारी सकाळी मिनीबस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मिनीबसने सगळ्या मैत्रिणी गोव्याला जात होत्या. रियुनियनचा प्लॅन करणारे सर्वजण हे सेंट पॉल शाळेच्या विद्यार्थीनी होत्या. प्रवाशांपैकी 11 जणी तसंच दोन चालकांचा मृत्यू झाला.
अपघातातून बचावलेल्या महिलेनं सांगितली भयकथा
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे अवघा देश हळहळला . आपापल्या आयुष्यामध्ये स्थिरसावर झालेल्या या जुन्या शाळकरी मैत्रीणींची बऱ्याच वर्षांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट घडून आली होती . पुढे या सर्वांनी गेट – टुगेदर’साठी एकत्र गोव्याला जायचा प्लॅन केला. मात्र प्रवासादरम्यानच त्यांच्यावर काळाने घाला घातला अन क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं … दरम्यान , या भीषण अपघातातून बचावलेल्या आशा जगदीश बेतुर यांनी अपघाताची भयकथा सांगितलीये. ” जेव्हा अपघात झाला तेव्हा मी सर्वात शेवटच्या सीटवर झोपले होते. एक क्षण समजलंच नाही काय झालं. अपघातामुळे बसलेल्या जोरदार धक्क्याने मी काही वेळासाठी बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा आजूबाजूला मैत्रिणींचे मृतदेह दिसले आणि बसचा मलबा पडला होता. मला काय करायचं काहीच समजेना. रडू येऊ लागलं. मोठ्याने ओरडावंसं वाटतं होतं. पण त्राण नव्हते अंगात. काही वेळानंतर घटनास्थळी महामार्ग पोलीस आले आणि त्यांनी मदत कार्यास सुरुवात केली. अपघातातून बचावलेल्या आशा बेतुर यांनी सांगितलं.
उठले अन् बहिणीला केला फोन…
अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी सांगताना आशा बेतुर म्हणतात, “मी धीर करून उठले. सगळ्यात अगोदर स्वतःला सावरलं. माझा मोबाईल हाती घेतला. आम्ही धारवाड जवळ जेथे नाश्त्याला थांबणार होतो तेथे माझी चुलत बहीण मला भेटणार होती. तिला फोन करून मी घडलेली घटना सांगितली. ती आणि तिचे मित्र लगेचच मदतीसाठी धावून आले. मात्र अपघात एवढा भयानक होता की पोलिसांनी मदतकार्य सुरू केल्यानंतरही त्यांना माझ्यापर्यंत पोहचायला बराच वेळ लागला. माझ्यासह अपघातात जखमी झालेल्या इतरांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं.”
धक्कादायक! मंगळुरूहून गोव्यात परतत होते, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं
शाळेपासूनच्या मैत्रिणी
जुन्या आठवणींना उजाळा देताना आशा बतुर सांगू लागल्या, आमच्यापैकी जवळपास सर्वच एकमेकींना शाळेत असल्यापासून ओळखत होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलो. दावणगिरी येथे आम्ही भेटत असू ट्रीपलाही जात असू. मात्र यावेळी आम्ही गोवा येथे रिसॉर्ट बुक केला होता. आम्ही रस्त्यात धारवाड जवळ नाश्त्यासाठी थांबणार होतो मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला. अन् एवढ्या वर्षांची मैत्री एका क्षणात संपली.
हेही वाचा – आजीसोबत गावी जाताना देवगडमधील 8 वर्षांच्या मुलावर काळाचा घाला
धक्कादायक! वडिलांचा पोटच्या मुलावर जीवघेणा हल्ला