दाऊदचे ‘चेले’ हादरले ; मंत्री अडचणीत येण्याची शक्यता…

‘एनआयए’चे मुंबईत २० ठिकाणी छापे

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांशी संबंधित मुंबईतील २० ठिकाणांवर सोमवारी एनआयएने छापे टाकले. दाऊदचे चेले छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांपर्यंत एनआयएच्या कारवाईची व्याप्ती आहे.
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पडताळणी सुरू, ‘हे’ आहे कारण…

सर्वांचे कनेक्शन दहशतवादी दाऊद इब्राहिमशी

एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, भेंडी बाजार, गोरेगाव, परळ, मुंब्रा आणि कोल्हापूर येथील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील काही तस्कर, हवाला ऑपरेटर, रिअल इस्टेट व्यापारी यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. या सर्वांचे कनेक्शन १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगितले जात आहे. कारवाईत एनआयएने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो.
हेही वाचाःपर्वरीत पोलिसांचा दुकानावर छापा, औषधं जप्त…

कामाठीपुराममधील सिंह सोसायटीत छापा

सलीम फ्रुट्सला २००६ मध्ये यूएईमधून भारतात पाठवण्यात आले होते आणि २०१० पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रूटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा प्लस पारकर यांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात. एनआयएच्या पथकाने कामाठीपुराममधील सिंह सोसायटी येथे छापा टाकला. पथकासोबत सीआरपीएफ जवानही होते.
हेही वाचाः’या’ तालुक्यात उभारणार आयआयटी प्रकल्प…

डी’ कंपनीविरुद्ध फेब्रुवारीत गुन्हा

फेब्रुवारीमध्ये गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीविरुद्ध बेकायदेशीर वसुलीचा गुन्हा दाखल केला होता. सध्याची छापेमारी त्याच प्रकरणी सुरू आहे, असे एएनआयतर्फे सांगण्यात आले आहे. हे गुंड खंडणीचा पैसा देशविरोधी कामांसाठी वापरतात, असा आरोप आहे. एनआयएने या प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचाःओबीसी दाखल्यासाठी ‘ती’ अट रद्द करावी…

काही मंत्र्यांवर कारवाईची शक्यता

दाऊदची बहीण हसिना पारकरकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे मागील दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप तपास यंत्रणेने लावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या नावासह महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत आता या प्रकरणाच्या तारा त्यांच्याशीही जोडल्या जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचाःश्रीलंकेतील हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू, नेत्यांची घरं जळून खाक…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!