कोविड लसीकरणासाठी जाताना दांपत्यावर काळाचा घाला

टेम्पोची दुचाकीला धडक

Goan Varta Live | प्रतिनिधी

देवगड : कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी जाणार्‍या दांपत्यावर काळानं घाला घातला. दुचाकीवरून रुग्णालयात जात असताना टेम्पोची धडक बसल्यानं त्यांचा हकनाक बळी गेला.

विजयदुर्ग-देवगड सागरी महामार्गावर हा अपघात घडला. कोविडची लस घेण्यासाठी जोशी दांपत्य देवगड ग्रामीण रुग्णालयात जात होतं. वाडा सडेवाडी इथं टेम्पोनं दुचाकीला धडक दिल्यानं संजय दत्तात्रय जोशी (वय 50) आणि त्यांची पत्नी सायली संजय जोशी (वय 47, दोन्ही रा. नाडण) ठार झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी 3.30 ते 3.45 वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात दुचाकीस्वार संजय जोशी हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी सायली जोशी हिला उपचारासाठी नेत असताना तिची प्राणज्योत मालवली.

अपघाताची माहिती मिळताच देवगडचे साहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कातीवले, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार फकरुद्दीन आगा, गणेश चव्हाण आदींनी पंचनामा केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!