तीन महिन्यात पहिल्यांदाच 50 हजारपेक्षा कमी रुग्ण! रुग्णसंख्या घटल्यानं मोठा दिलासा

रुग्ण बरे होण्याचं सर्वाधिक प्रमाण असलेला भारत एकमेव देश

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने कोविडविरुद्धच्या लढाईत अनेक महत्वाचे मैलाचे दगड पार केलेत. गेल्या 24 तासांत आढळलेल्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सुमारे तीन महिन्यांनंतर 50000 (46,790) पेक्षा कमी आढळली आहे. याआधी, 28 जुलै रोजी रुग्णांची एका दिवसातली संख्या 47,703 असल्याची नोंद आहे.

दररोज कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून मृत्यूदरही सातत्याने घटतो आहे. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने कमी होत आहे. भारताने मिळवलेले आणखी एक यश म्हणजे, एकूण संख्येच्या तुलनेत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. सध्या देशभरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7.5 लाखांपेक्षाही कमी (7,48,538) आहे. आजपर्यंतच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे हे प्रमाण 9.85% इतके आहे.

रिकवरी रेटमध्ये मोठी वाढ

सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना दुसरीकडे मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 67 लाखांपेक्षा अधिक रुग्ण (67,33,328) या आजारातून बरे झाले आहेत. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत सातत्याने वाढत असून, आज ही तफावत 59,84,790 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 69,720 रुग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता देशाचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 88.63% इतका आहे. बरे झालेल्या रूग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्रात एका दिवसात, सर्वाधिक 15,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर त्या खालोखाल कर्नाटकात एका दिवसात 8,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत 5,000 पेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आढळलेत.

गेल्या 24 तासांत देशभरात 587 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 81% टक्के 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 600 पेक्षा कमी आढळला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 125 मृत्यूंची नोंद झाली.

कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेला भारत एकमेव देश आहे, तसेच मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आज हा मृत्यूदर 1.52% इतका आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या घटीचा हा परिणाम आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!