DONATION IN PM CARES FUND | करोना काळात क्रिकेटर्सने केली मदत… जाणून घ्या कुणी किती दिले…

भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी क्रिकेटर्सकडून भरघोस मदत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज पॅट कमिन्सने ही मदत केली आहे. या मदतीनंतर भारतीय खेळाडू कुठे आहेत, ते मदतीसाठी का पुढे येत नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.

कमिन्सने दिले ३७ लाख…

कमिन्सने यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.

भारत माझं दुसरं घर

ब्रेट लीनं मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना परिस्थितीवरून त्यानं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली.

मिथाली राजकडून 10 लाखांची मदत

भारतीय महिला क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू असणाऱ्या मिथालीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपये आणि तेलंगणच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख असे एकूण दहा लाख रुपये दिल्याची माहिती मागील वर्षी ३० मार्च रोजी दिली होती.

रोहित शर्माकडून कोरोना काळात 80 लाखांची मदत

मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणाऱ्या रोहितने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ४५ लाख रुपये मागील वर्षी दिले. तसंच त्याने महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे त्याने पाच लाख रुपये अन्नदान करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला तर पाच लाख कुत्र्यांबरोबर मुक्या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या संस्थेला दिले. त्याने एकूण ८० लाखांचा निधी करोना काळात दिला.

विरुष्काकडूनही मदतीसाठी हात

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले. मात्र त्यांनी किती पैसे दिले यासंदर्भातील खुलासा केला नाही.

मास्टर ब्लास्टरकडून 50 लाख

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुकलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी दिला. यासंदर्भातील माहिती सचिननेच ट्विटरवरुन दिली होती.

सौरभ गांगूलीने दिले 50 लाख

सचिनचा एकेकाळचा संघ सहकारी आणि सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरभने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा निधी मागील वर्षी दिलेला. त्याचप्रमाणे त्याने गरजू लोकांना तांदूळ वाटप केलेलं.

सुरेश रैनाकडून 51 लाखांची मदत

चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील धडाकेबाज फलंदाज असणाऱ्या रैनाने मागील वर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती मात्र करोनासंदर्भातील मदत करण्यामध्ये तो मागे हटला नाही. रैनाने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ३१ लाख तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाख रुपये देण्याची घोषणा केलेली.

हेही वाचाः राज्यात 24 तासांत 24 जणांनी गमावला जीव

शिखर धवनही मदतीसाठी पुढे

शिखर धवननेही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पैसे दिले होते. मात्र त्याने नक्की किती पैसे दिले याचा खुलासा केला नव्हता. त्याने संकट काळात इतरांनाही पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

मी केलेली मदत समुद्रातील थेंबाप्रमाणे

अजिंक्य रहाणेने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांचा निधी दिलेला. आपण केलेलं काम हे खूपच लहान असून मी केलेली मदत ही समुद्रातील एखाद्या थेंबाप्रमाणे असल्याचं रहाणे म्हणाला होता.

पठाण बंधुंकडून गरजूंना मदत

इरफान पठाण आणि युसूफ पठाण – पठाण बंधुंनी मास्कचा तुटवडा असताना चार हजार मास्कचे वाटप केलं होतं. स्थानिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी हे वाटप केलं होतं. तसेच त्यांनी अन्नधान्यचंही वाटप केलं होतं. गोरगरीब आणि गरजुंना त्यांनी राशनचं वाटप केलेलं.

पुनम यादवकडून 1 लाख

भारतीय महिला क्रिकेट संघातील लेग स्पीनर असणाऱ्या पुनम यादवने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी एक लाखांचा निधी दिलेला.

दिप्ती शर्माकडून दीड लाखांचा निधी

महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या दिप्ती शर्माने एकूण दीड लाखांचा निधी दिला होता. तिने पंतप्रधान सहाय्यता निधीसोबतच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये दिले होते.

रिचा घोषने दिले 1 लाख

१६ वर्षीय रिचा घोष हीने पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिलेला.

गौतम गंभीरने दिली खासदार निधीतून 1 कोटी

सध्या भाजपाचा खासदार असणाऱ्या गंभीरने मागील वर्षी २८ मार्च रोजी पंतप्रधान मदत निधीसाठी दोन वर्षांचा पगार देत असल्याची घोषणा केली. तसंच त्याने दिल्ली सरकारला स्थानिक विकास निधीसाठी मिळणाऱ्या खासदार निधीतून एक कोटी रुपये दिले. त्याचप्रमाणे गंभीरने आपल्या खासदार निधीमधून गरिबांना स्वस्तात खाणं उपलब्ध करुन देणारं कॅन्टीनही सुरु केलं आहे.

बीसीसीआय क्रिकेट संघटनांकडूनही मदत

बीसीसीआयच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या क्रिकेट संघटनांनी एकूण ५३ लाख २२ हजार रुपये सरकारला मदत निधी म्हणून दिलेले. बीसीसीआयने स्वत: सरकारला मदत म्हणून ५१ कोटींचा निधी दिलेला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!