कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन

रेमडेसिव्हिरचा वापर न करण्याचे निर्देश

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ती रोखण्यासाठी सर्व प्रयत्न चालवले आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, जर कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम मुलांवर होऊ शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावरील उपचारांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

हेही वाचाः माहिती खात्यातर्फे गोव्यातील ‘मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये’वर वेबिनार

काय आहेत मार्गदर्शक सूचना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने जारी केलेल्या नवी मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५ वर्षांखालील मुलांना मास्कची आवश्यकता नाही. ६ ते ११ वयोगटातील मुलांनी पालक/डॉक्टरांच्या देखरेखीखाली मास्क वापरावा. तसंच कोरोनावरील उपचारांसाठी मुलांना रेमडिसिव्हिर न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासह सीटी स्कॅन अत्यंत आवश्यक असतानाच करा, असं सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त त्यात असंही नमूद करण्यात आलं आहे की, 18 वर्षांखालील मुलांमध्ये रेमडेसिव्हिरच्या परिणामाबद्दल आणि त्यांच्यासाठी ते किती सुरक्षित आहे याबद्दल अद्याप पुरेसा डेटा उपलब्ध नाही.

हेही वाचाः इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती

मुलांमध्ये गरजेनुसारच सीटी स्कॅन करावं

डीजीएचएसने आपल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे की, मुलांच्या बाबतीत सीटी स्कॅनचा वापर रुग्णालयांनी विचारपूर्वकच केला पाहिजे. फुफ्फुसातील संक्रमणाची स्थिती शोधण्यासाठी कोरोना रुग्णांचे सीटी स्कॅन केलं जातं. त्यानुसार, सीटी स्कॅनदरम्यान प्राप्त झालेल्या कोणत्याही अतिरिक्त माहितीस रुग्णाच्या उपचारात घेतलेल्या निर्णयाला फारसं महत्त्व नसतं. ते कसं पोहोचले यावर अवलंबून असतं. म्हणूनच मुलांमध्ये कोरोना उपचार करताना डॉक्टरांनी त्याचा वापर सूज्ञपणे आणि केवळ जेव्हा आवश्यक असेल तेव्हा केला पाहिजे.

हेही वाचाः गर्भवती महिलांनी तूर्तास कोरोनाप्रतिबंधक लस घेऊ नये

लक्षणे नसताना स्टिरॉइड्सचा वापर हानिकारक

डीजीएचएसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सौम्य आणि असिम्प्टोमॅटिक कोरोनाच्या बाबतीत त्यांच्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर हानिकारक सिद्ध होऊ शकतो. यामुळे साधारण ते गंभीर रुग्णांसाठीच रुग्णालयांत याचा वापर केला जावा. यासोबतच तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच रुग्णांना स्टेरॉइड्स दिलं जावं. या मार्गदर्शक तत्त्वात असं नमूद केलं आहे की, योग्य वेळी स्टिरॉइड्स वापरणं आवश्यक आहे. तसंच त्याच्या योग्य डोस आणि त्याच्या वेळेबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. लोकांनी या स्टिरॉइड्सचा वापर स्वतःच करू नये, हे धोकादायक ठरू शकतं.

हेही वाचाः देशात बुधवारी २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

मुलांसाठी 6 मिनिट वॉक टेस्टचा सल्ला

डीजीएचएसने आपल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 12 वर्षांवरील मुलांना बोटात ऑक्सिमीटर लावून 6 मिनिट वॉक टेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. या चाचणीद्वारे कोरोना संक्रमित मुलांच्या शारीरिक क्षमतेचं मूल्यांकन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही चाचणी पालकांच्या देखरेखीखाली करण्यास सांगितलं गेलं आहे. यादरम्यान, जर त्याचा सॅच्युरेशन 94 पेक्षा कमी असल्याचं आढळून आलं आणि त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसंच, दम्याचा त्रास असलेल्या मुलांसाठी ही चाचणी नाही, असंही या मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!