याला दिलासादायक आकडा म्हणायचं का? कारण देशात…

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण देशातील कोरोनाची मंगळवारची आकडेवारीही दिलासादायक आहे की नाही, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. याचं कारण म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची देशभरातली संख्या जास्त आहे. मात्र दिलासादायक म्हणणं कितपत योग्य ठरेल असाही प्रश्न आहेच. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीमध्ये, मृतांच्या आकडेवारीची नोंद ही पुन्हा एकदा ४ हजाराच्या जवळपास असल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकूणच देशभरात चिंतेचं वातावरण आहे.

corona update

नेमकी आकडेवारी काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार नव्या ३ लाख २९ हजार ९४२ म्हणजेच जवळपास ३ लाख ३० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. मंगळवारी म्हणजे ११ मे रोजी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात तब्बल ३ लाख ५६ हजार ८२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. याचाच अर्थ बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे नव्या रुग्णांच्या तुलनेत मंगळवारी जास्त नोंदवण्यात आलं आहे.

दिलासादायक का नाही?

दरम्यान, गेल्या २४ तासांत बरे झालेले रुग्ण जरी नव्या रुग्णांपेक्षा जास्त असले तरी देशातील मृत्यूदर ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरु लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा तब्बल ३ हजार ८७६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यंत देशातील एकूण कोरोना बळींचा आकडा हा अडीच लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

रुग्णसंख्या कशी घटली?

एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच देशातील वेगवेगळ्या राज्यांत, जिल्ह्यांत आणि शहरांमध्ये वाढत्या कोरोनामुळे गर्दी रोखण्यासाठी नवे निर्बंध जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांत रुग्णवाढीचा वेग घटत असून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ११ दिवसांत तब्बल ३५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी दिलासादायक मानली जाते आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं कोरोनाबाबतची भीतीही काही प्रमाणात दूर होते आहे.

वाचा ११ दिवसांतली बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी

१ मे – २,९९,९८
२ मे – ३,०७,८६५
३ मे – ३,००,७३२
४ मे – ३,२०,२८९
५ मे – ३,३८,४३९
६ मे – ३,२९,११३
७ मे – ३,३१,५०७
८ मे – ३,१८,६०९
९ मे – ३,८६,४४४
१० मे – ३,२८,६८०
११ मे – ३,५६,०८२

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!