दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

दुप्पट वेगानं कोरोना पुन्हा फोफावत असल्यानं भीती

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहेय. पहिल्या लाटेपेक्षाही अधिक वेगानं लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याचं आकडेवारीतून अधोरेखित होतंय. देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास आठ ते नऊ हजारांनी वाढली असून, जवळपास ९० हजार नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. २४ तासांच्या कालावधीत मृतांचा आकडा अडीचशेने वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

24 तासांत किती वाढ?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशात मागील २४ तासांत ८९ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ४४ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या कालावधीत देशात ७१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात ६ लाख ५८ हजार ९०९ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी

देशात गुरूवारी ८१ हजार ४६६ कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर ४६९ जणांचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी ७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच २४ तासांच्या कालावधीत मृतांची संख्येत २५० ने वाढ झाली आहे. गुरुवारी झालेली रुग्णवाढ मागील सहा महिन्यातील उच्चांकी वाढ होती. त्यानंतर हा उच्चांकही मोडीत निघाला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

राज्यातही चिंता, शुक्रवारी आणखी २८० बाधित

पणजी : सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेवर पोहोचला. शुक्रवारी तब्बल २८० नवे कोरोनाबाधित आढळले, एकाचा मृत्यू झाला, तर ८१ जण कोरोनातून मुक्त झाले. त्यामुळे सक्रिय बाधितांचा आकडा वाढून १,९१४ झाला आहे. यामुळे सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांत चिंता पसरली आहे. बाधितांचा आकडा वाढत असल्याने आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने राज्यातील बरे होणाऱ्यांचा दरही कमी होऊन ९५.३१ टक्क्यांवर आला आहे. राजधानी पणजीसह इतर महत्त्वपूर्ण शहरांतील बाधितांची संख्याही वाढत आहे. सद्यस्थितीत पणजीत सर्वाधिक २१० बाधित आहेत. त्यानंतर पर्वरीत २००, मडगावात १८८, फोंड्यात १५१, कांदोळीत १४१, वास्कोत १२८ सक्रिय रुग्ण आहेत.

धार्मिक स्थळांवर बंदी शक्य!

करोना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याच्या सूचना; प्रशासन सक्रिय

विवाह सभागृहे, हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरन्टचे परवाने होऊ शकतात रद्द

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या, नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून राज्यभरात करोना जागृतीची मोहीम

कोरोना प्रसार रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन न केल्यास राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात येतील. तसेच विवाह सभागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, कॅसिनोंमध्ये जास्त बाधित आढळून आल्यास ही आस्थापने तीन-चार दिवस बंद ठेवण्यात येतील. त्यानंतरही आस्थापनांच्या मालकांनी मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा सज्जड इशारा विविध तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदा घेऊन दिला आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. आगामी काळात आणखी प्रसार वाढल्यास राज्यावर बिकट संकट ओढवण्याचा धोका आहे. कोरोनामुळे मार्च २०२० नंतर देशभरासह गोव्यात पडलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल झाले होते. राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली होती. लॉकडाऊनचा गोमंतकीय जनतेला मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे यावेळी सरकारने लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण, नागरिकांनी स्वत:हून स्वत:सह इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्थळी गर्दी करणाऱ्या आणि कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असे तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन आरोग्य खात्याने करोना चाचण्यांत वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच तत्काळ करोना चाचणी करून घ्यावी. तसेच इतरांमध्येही जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. यापुढे हॉटेल्स, मॉल्स, विवाह सभागृह, रेस्टॉरन्ट, कॅसिनो आदी आस्थापनांमध्ये अधिकाधिक करोनाबाधित आढळल्यास अशी आस्थापने सुरुवातीला तीन-चार दिवस बंद ठेवण्यात येतील. त्यानंतरही संबंधित आस्थापनांच्या मालकांनी काळजी न घेतल्यास उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात येतील. याशिवाय मंदिरे, मशिदी, चर्च यांसारख्या धार्मिक स्थळांवरही कोरोना नियमांचे पालन न झाल्यास धार्मिक स्थळेही बंद केली जातील, असे गावस म्हणाले.

कामासाठी परराज्यांतून येणाऱ्या कामगारांची संबंधित हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरन्ट तसेच इतर आस्थापनांची मालकांनी प्रथम करोना चाचणी करून घ्यावी. आपल्या आस्थापनांत येणाऱ्या ग्राहकांना मास्क, शारीरिक अंतर, सॅनिटायझरची सक्ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, बार्देशचे उपजिल्हाधिकारी कपिल फडते, सत्तरीचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनीही शुक्रवारी पत्रकार परिषदा घेत नागरिकांना करोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारी इस्पितळांत मोफत लसी देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ करोना लसीचे दोन्ही डोस घेऊन स्वत:ला करोनापासून दूर ठेवावे. दोन्ही डोस घेतल्यानंतरही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रुग्ण वाढीची ‘एसईसी’कडून गंभीर दखल

राज्यात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण १०.१५ टक्के असल्याने सरकारसह प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून खबरदारीच्या उपाययोजना आखण्याच्या सूचना राज्य कार्यकारी समितीने (एसईसी) संबंधित खात्यांना केल्या आहेत.

कोरोना नियंत्रणासाठी काम केलेल्या कदंबा, पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी), वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि उर्वरित फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

विमानतळ तसेच रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंग सुरू ठेवण्याचे तसेच बाधितांवरील उपचारांसाठी इस्पितळे, कोविड केअर सेंटर्स सज्ज ठेवण्याचे निर्देशही समितीने दिले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!