वाह रे मुन्नाभाई! कम्पांऊडर चालवत होता २२ बेडचं हॉस्पिटल!

पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील घटना; मेहबूब शेख बनला डॉ. महेश पाटील

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने पुण्यात स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरू केलं होतं. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे रुग्णालय चालवलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचाः FRAUD | अखेर ती महिला ठकसेन गजाआड

बोगस डॉक्टर

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एमबीबीएस डिग्री असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख असून, तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

हेही वाचाः ALERT | एसबीआय ग्राहकांनो सावधान! चुकूनही इंटरनेटवर शोधू नका ‘हा’ नंबर

मेहबूब शेख ते डॉ. महेश पाटील बोगस डॉक्टरचा प्रवास

शिरूरमध्ये डॉक्टर असल्याचं दाखवून 22 बेडचं स्वतःच रुग्णालय चालवणाऱ्या कंपाऊडरची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने संपूर्ण माहिती दिली. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, “पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की,  मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केलं. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदललं. त्याने बनावट डिग्री आणि आधार कुठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरू केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.” असं घनवट यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः Crime | नवऱ्यानं बायकोचा हातच कापला! नवरा बायकोच्या भांडणांनी ‘या’ राज्यात गाठला कहर

मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केलेत तर काहींवर अजूनही सुरू आहेत. मात्र त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे. यातल्या काही नातेवाईकांनी आपला अनुभव सांगितला. सध्या हा मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. या बारावी नापास मेहबूबला डॉ. महेश पाटील बनण्यासाठी कुणी मदत केली याचाच शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचाः CYBER CRIME! स्वप्नीलच्या करामती पाहून पोलिसही थक्क

रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होता. मात्र, पोलिसांनी सोमवारी (12 एप्रिल) त्याच्या रुग्णालयावर छापा टाकून त्याची लबाडी चव्हाट्यावर आणली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या मध्यस्तीने भांडण सोडवण्यात आलं. बोगस डॉक्टरवर रांजणगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी इतरस्त्र हलवण्यात आले.

हेही वाचाः ALERT! पेट्रोल भरताना तुमची अशी होते फसवणूक!

बोगस डॉक्टरचा पर्दाफाश कसा झाला?

बोगस डॉक्टर महमूद शेख हा कारेगाव भागामध्ये महेश पाटील असे नाव वापरून हा गोरख धंदा चालवत होता. मात्र काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. आरोपीला त्याच्या कुटुंबियांचा फोन आला तेव्हा तो त्यांच्याशी हिंदी भाषेत संभाषण करायचा. फोनवर बोलताना तो फूफा, अम्मी, अबू असे शब्दप्रयोग करायचा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयावर छापा टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!