#ChiplunFlood | महापुराने चिपळूण बस स्टँडसह एसटीही पाण्याखाली

ढगफुटीने चिपळूणमध्ये जनजीवन विस्कळीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

चिपळूण : संपूर्ण चिपळूण हे जलमय झालंय. चिपळुणात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसाने चिपळुणातील जनवजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. चिपळुणात जाण्यासाठीचे सगळे मार्ग ठप्प झालेत. मुंबई गोवा महामार्गही पाण्याखाली गेलाय. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरएफसह स्थानिक यंत्रणाही तातडीनं कामाला लागल्यात.

दरम्यान, चिपळुणातील बसस्टॅन्ड हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. धक्कादायक बाब म्हणजे या पुराच्या पाण्याने एसटी बसलाही गिळलंय. बसस्टॅन्डमध्ये असलेल्या एसटीचं फक्त टप फोटोत दिसतंय. त्यामुळे चिपळुणातील परिस्थिती किती भयंकर असेल, याची निव्वळ कल्पना करता येऊ शकेलं. काही फोटोंमध्ये एसटीच्या अर्ध्यापर्यंतच पुराचं पाणी आल्याचं दिसलं होतं. मात्र आता जे फोटो समोर आले आहेत, त्यात फक्त एसटीचं टपच दिसतंय. यावरुन पुराचं पाणी किती वाढलं असेल, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

चिपळूण शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. ८ ते १० फूट पाणी साचलं आहे. अनेक लोक वरच्या मजल्यांवर स्थलांतरित होत आहेत. तर तळमजल्यावर राहणाऱ्या अनेकांच्या घरातील सामानाला पुराच्या पाण्याचा फटका बसलाय. किती जणांचे संसार या पाण्याने उद्ध्वस्त केलेत, याची कल्पनाही करवत नाही.

विशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चिपळूण शहरात पाणी शिरलंय. चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं नागरिकांना २००५च्या पुराची आठवण झाली. त्यामुळं नागरिक धास्तावलेत. अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. या नागरिकांना बचावासाठी एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये पोहोचले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा तसेच रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिलेत. तसंच नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, असेही निर्देश देण्यात आलेत.

हेही वाचा : Video | महापुराचा वेढा, पहिल्या मजल्यापर्यंत चिपळुणात पुराचं पाणी

दरम्यान, खेड आणि चिपळूणचा संपर्क तुटलेलाच असून नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीत आढावा घेतला असून तातडीच्या मदतीसाठी यंत्रणांना कार्यान्वित करण्यात आलं आहे.

हेही वाचा : मुंबई गोवा महामार्ग ठप्प; कणकवलीत वागदेजवळ हायवेवर पाणीच पाणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!