क्या बात! चोराला पोलिसांनी मोबाईल गिफ्ट केला कारण…

सर्विलन्सच्या माध्यमातून पोलिसांनी या 13 वर्षांच्या मुलाला पकडलं.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडूमध्ये चोरीचा एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. मोबाईल चोरणाऱ्यालाच पोलिसांनी मोबाईल फोन गिफ्ट केला आहे. ही गोष्ट जरा चक्रावणारी असली, तरी पोलिसांनी ज्या कारणासाठी चोराला मोबाईल गिफ्ट केलाय, ते कारण काबिल-ए-तारीफ आहे. 13 वर्षांच्या मुलाने मोबाईल चोरल्याचं कळताच पोलिसांनी त्याला पकडलं खरं. मात्र मोबाईल चोरी करण्याचं कारण जेव्हा पोलिसांना कळलं, तेव्हा पोलिसांचेही डोळे पाणावले.

…म्हणून मोबाईल चोरला होता

13 वर्षांच्या मुलानं मोबाईलची चोरी केली. हा 13 वर्षांचा मुलगा कॉर्पोरेशन शाळेचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील एका बिस्किटाच्या दुकानात काम करतात. आई घरकाम करुन संसाराला हातभार लावते. अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या मुलाच्या घरी मोबाईलच कुठून येणार? कोरोनामुळे सध्या मुलांचं ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यासाठी लागतो मोबाईल. तर मोबाईलच नसल्यामुळे या मुलाचं शिक्षण थांबलं. ऐपत नसल्यानं या मुलावर चोरी करण्याची वेळ आली.

ऑनलाईन क्लासला हजेरी लावता यावी, यासाठी या मुलानं मोबाईलची चोरी केल्याचं पोलिसांच्या ध्यानात आलं. सर्विलन्सच्या माध्यमातून पोलिसांनी या 13 वर्षांच्या मुलाला पकडलं. त्यानं चोरी केलेला फोनही जप्त केला. मात्र घरी गोष्ट कळल्यानंतर भारावलेल्या पोलिसांनी या 13 वर्षांच्या चिमुरड्याला स्वतःच्या पैशातून फोन खरेदी करुन गिफ्त केला. पोलिसांच्या या गिफ्टमुळे आता त्याचं शिक्षण पुन्हा सुरु होणार आहे.

इतरांचं काय?

एका मुलाला मोबाईल देणं चेन्नई पोलिसांना शक्य आहे. पण अशी कित्येक मुलं देशाच्या कानाकोपऱ्यात आहे, ज्यांचं शिक्षण मोबाईल फोन अभावी अडलंय. तर काहींचं नेटवर्कअभावी अडलंय. अशांनी भविष्याच चोरीचा मार्ग निवडला, तर त्यांना गुन्हेगार बनवण्यासाठी जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे आहे का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!