निसर्गाचा प्रकोप! मोठी दुर्घटना! तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी
महाड : महाडमध्ये मुसळधार पावसात मोठी दुर्घटना गुरुवारी घडली. तळई गावावर दरड कोसळलीये. तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झालाय. अजूनही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास ३० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

या घटनेची माहिती मिळताक्षणी घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झालंय. बचाव आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. एकीकडे चिपळुणातील पुरातून महाराष्ट्र सावरणं तर दूरच पण दुसरीकडे आणखी एका मोठ्या दुर्घनटेनं शोककळा पसरली आहे.
गेल्या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क 10 ते 15 फूट पाणी रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये शिरलंय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केलीय. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय.

हेही वाचा : जगाचा विनाश जवळ आलाय? चीनमध्ये महाप्रलय! पाहा महापुराचे महाभयंकर Video
पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून चौघांचा मृत्यू
तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय. 4 जण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आलीय. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवण्याचं काम सुरु आहे.
हेही वाचा : Video | बापरे! सावंतवाडा केरी सत्तरीत रस्ताच वाहून गेला
चिपळुणात 8 कोविड रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरीत आलेल्या महापुराचा फटका कोविड रुग्णालयाला बसलाय. तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या कोविड रुग्णालयाला चहूबाजुंनी पाण्याने वेढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
हेही वाचा : ChiplunFlood | महापुराने चिपळूण बस स्टँडसह एसटीही पाण्याखाली