या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगणचं प्रकाशन का नाही?

Goan Varta Live | प्रतिनिधी
सचिन परब | वार्षिक रिंगणचा संपादक | 9987036805 | 9420685183
आषाढी एकादशीच्या पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगणचं होणारं प्रकाशन ही आपल्या सगळ्यांसाठी दरवर्षीचा दुवा होता. अनेकजण त्यासाठी महापूजेचा कार्यक्रम बारकाईने बघत. महापूजेला मिळालेलं सांस्कृतिक परिमाण म्हणून जाणकारांनी त्याचं कौतुक केलं होतं. पण या वर्षी आषाढीच्या चार दिवस आधीच विठ्ठल रखुमाईच्या चरणी रिंगणचा संत परिसा भागवत विशेषांक अर्पण करून त्याचं प्रकाशन झालं.
या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन का नाही? असं सगळे विचारत आहेत. ते कधीतरी थांबवावं लागणारच होतं. कारण ते प्रसिद्धीसाठी सुरू केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह एकूण पाच मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी रिंगणचं प्रकाशन केलं. रितसर अर्ज करूनही आम्हाला दरवर्षी मंदिर समितीच्या कार्यक्रमात घुसावं लागत होतं. पत्रकार असण्याचा विशेषाधिकार वापरून कार्यक्रम पत्रिकेत नसताना प्रकाशन करून घेत होतो. त्यासाठी सगळी धक्काबुक्की, दमदाटी करत होतो. ते करताना दरवर्षी विचार करायचो, खरंच याची गरज आहे का?

गेल्या वर्षी दहा अंक झाले. पुरे झालं. रिंगणचा वाचक हा रिंगणशी रिंगणमुळे जोडलेला आहे. त्याला प्रकाशन कोणाच्याही हस्ते झालं तर फरक पडत नाही. त्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतला. आणि चार दिवस आधीच प्रकाशन करून घेतलं. पुढे कधी मंदिर समितीला किंवा एखाद्या मुख्यमंत्र्यांना वाटलं, आणि त्यांनी स्वतःहून बोलावलं तर विठ्ठलाची इच्छा समजून जरूर जाऊ. ते काही होईल असं वाटत नाही.
खरंतर या प्रकाशनाची सवय लागली होती. प्रशांत जाधव आणि सूर्यकांत भाऊंसोबत आदल्या दिवशी पंढरपूरला जाणं. रात्री दोन वाजल्यापासून वाट बघणं. सगळ्या पत्रकार मित्रांची धावाधाव. मंदिराच्या सभामंडपातलं प्रसन्न वातावरण. प्रकाशन होईल की नाही याची धाकधूक. सुनील दिवणांच्या वशिल्याने अचानक होणारं प्रकाशन. नंतर टीवीवाल्या पत्रकार मित्रांनी घेतलेले वन टू वन. टीवीवर दिसलो म्हणून येणारे फोन. पहाटे पंढरपुरातल्या गर्दीत संबंधितांना अंक देण्यासाठी फिरणं. प्रचंड गर्दीतून मुंगीच्या गतीने वाट काढत सोलापूरला पोचणं. तिथे पत्रकार संघात प्रकाशनाचा कार्यक्रम. पुढे जोडलेले आणखी कार्यक्रम. परत येताना संत सावता माळी यांच्या अरणला भेट.
आता हे काही होणार नाही. या सगळ्या उपाधींपासून लांब आधीच रिंगण विठ्ठल रखुमाईच्या चरणी पोचलं आहे. मी भरून पावलो आहे.