म्हशीने शेपटी मारली म्हणून सासर्याने केला सुनेचा खून

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
प्रयागराज (उत्तर प्रदेश) : म्हशीने शेपटी मारून आपल्या धाकट्या मुलाचे कपडे खराब केले, या क्षुल्लक कारणावरून सासर्याने थोरल्या सुनेचा कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना मेहवाघाट भागातील अलवारा गावात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीचा धाकटा मुलगा घराबाहेर जात होता. त्याच वेळी थोरली सून आपल्या म्हशीला बांधत होती. तेवढ्यात म्हशीच्या शेपटीचा फटका तिच्या दिराला बसला. शेपटी बसल्यामुळे त्याचे कपडे खराब झाले. यावरून तो वहिनीला शिविगाळ करू लागला. तिने विरोध करताच त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. हे पाहून संतापलेल्या तिच्या सासर्याने घरातून कुर्हाड आणून सुनेच्या डोक्यावर व मानेवर घाव घातले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा तडफडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत महिलेचा दीर पळून गेला, तर सासर्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेला (वय 35) चार लहान मुले आहेत. तिचा पती प्रयागराज येथे मोलमजुरी करतो.