Breaking | भारतात कोरोनाची त्सुनामी! तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण

२४ तासांत हजारपेक्षा जास्त रुग्ण दगावले

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढलाय. त्यामुळे आता याला कोरोनाची दुसरी लाट न म्हणता त्सुनामीच म्हणावं लागेल, असं जाणकार आणि डॉक्टर सांगत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासातली आकडेवारी पुन्हा एकदा २ लाखाच्या पार गेली आहे.

गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, आरोग्य खात्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा – तानावडे म्हणतात, निर्बंध हवेच! याला लॉकडाऊनचे संकेत म्हणायचं का?

मृत्यूदराची चिंता

आतापर्यंत देशात १ लाख ७५ हजार ६४९ रुग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या सक्रिय रुग्णसंख्या १६ लाख ६९ हजार ७४० वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तर ११ कोटी ९९ लाख ३७ हजार ६४१ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

coronavirus-test-1606815937

देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंतेचा विषय ठरु लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी लॉकडाऊन सदृश्य नियमांचं पालन केलं जातंय.

हेही वाचा – CORONA | कोरोनावरील घरगुती औषधाचा दावा किती सत्य?

राज्यातही चिंता

राज्यात शुक्रवारी रुग्णवाढीनं नवा उच्चांक गाठला. तब्बल ९२७ नवे रुग्ण आढळून आलेत. १०० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. २८२ रुग्ण कोरोनातून बरे झालेत. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनं रिकव्हरी रेट ८९.०२ टक्के इतका खाली आला आहे. तर तब्बल ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीवर थेट पाहायला मिळतोय. सक्रिय रुग्णसंख्या आता ६ हजार ३२१वर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला ३५७ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.

हेही वाचा – CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

राज्यात कोरोनाचे 6 बळी गेले असले तरी त्यातील दोघे जण हे सिंधुदुर्ग, बेळगावचे असल्याचं कळतंय. मृतांमध्ये एकूण ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाचाही मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या रुग्णांपैकी अनेक जण हे होम आयसोलेशनमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

हेही वाचा – CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!