ब्रेकिंग! सचिन तेंडुलकर रुग्णालयामध्ये दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सचिन तेंडुलकरे २७ मार्चला आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. करोनावरील उपचारांसाठीच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मागील काही दिवसांपासून सचिन घरीच होम क्वारंटाइन होता. मात्र डॉक्टरांच्या सल्लानुसार तो रुग्णालयामध्ये दाखल झालाय. सचिननेच ट्विट करत ही माहिती दिलीये.

ट्विट करून दिली माहिती

“माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालोय. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं सचिनने ट्विट करुन सांगितलंय. तसंच त्याने २०११ साली २ एप्रिलला विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा देणारं एक वाक्यही या ट्विटमध्ये लिहिलंय. “सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन,” असं सचिनने म्हटलंय. यामध्ये त्याने भारतीय झेंड्याचा इमोन्जीही वापरलाय.

२७ मार्चला झाला होता कोरोना

२७ मार्च रोजी सचिनने केलेल्या ट्विटमध्ये, “करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. तसंच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसताहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलंय. तसंच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचं मी पालन करतोय,” असं म्हटलं होतं. तसंच “मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असं म्हणत त्यांनी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.

युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या सचिनपाठोपाठ युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती शनिवारीच समोर आली. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली होती. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरने करोना झाल्याचं स्पष्ट केलं तर त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!