#Bihar Election : शिवसेनेनं कंबर कसली

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून शिवसेनेनंही बिहारच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेना बिहार विधानसभेच्या ५० जागा लढवणार आहे. या निवडणुकिसाठी शिवसेनेनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे.
शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार असली, तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना एका तासाचा अधिक कालावधी देण्यात आला आहे.
हे आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
गुप्तेश्वर पांडेंचा पत्ता कट
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Sing Rajput) प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) यांना या निवडणुकीत तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे.