बिहार निवडणुकीचं बिगुल वाजलं…

28 ऑक्टोबरपासून तीन टप्प्यांत मतदान, 10 नोव्हेंबरला निकाल; महामारीच्या दिवसांत देेशातील पहिलीच निवडणूक.

महेश दिवेकर | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बिहारात (Bihar) विधानसभा निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक तारखांची घोषणा केली. 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल.

सध्याच्या महामारीच्या काळात बिहारात विधानसभा निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विविध पक्षांनी केली होती. तथापि, न्यायालयात त्या संदर्भातील मुद्दे टिकू शकले नाहीत. त्यानंतर 243 सदस्य संख्या असणार्‍या बिहार विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार पाटणा आणि बागलपूर जिल्ह्यांत पहिल्या दोन टप्प्यांत मतदान पार पडेल. दरभंगा, मधुबनी, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मुजफ्फरपूर, वैशाली, समस्तीपूर आणि सीतामढी या आठ जिल्ह्यांत दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात मतदान होईल.

करोनाबाधितांसाठी खास व्यवस्था
महामारीच्या दिवसांत देेशातील ही पहिलीच निवडणूक ठरत आहे. दरम्यान, करोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्या देखरेखेखाली ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निवडणुकीचे तीन टप्पे असे…

  • पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांंतील 71 मतदारसंघांत मतदान होईल.
    त्यासाठी अधिसूचना 1 ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यानंतर 28 ऑक्टोबरला मतदान.
  • दुसर्‍या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 मतदारसंघांत मतदान होईल. त्यासाठी अधिसूचना 9 ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यानंतर 3 नोव्हेंबरला मतदान होईल.
  • तिसर्‍या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 78 मतदारसंघांत मतदान होईल. त्यासाठी 13 ऑक्टोबरला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 7 नोव्हेंबरला मतदान होईल.
  • निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होईल.

    जिल्हा पंचायत, पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा!
    पणजी : देशभरात करोनाचा वेगाने संसर्ग होत असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेची निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा पंचायत आणि पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुका १८ ऑक्टोबर रोजी घेण्याच्या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच मान्यता दिली आहे. शिवाय ऑक्टोबरपर्यंत राज्यातील करोना स्थिती नियंत्रणात असल्यास नगरपालिका आणि जिल्हा पंचायत या दोन्ही निवडणुका एकाचवेळी होऊ शकतात, असे संकेतही राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहेत.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!