कोरेगाव-भीमा : एनआयएकडून आठजणांविरोधात एफआयआर

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयएनं आठजणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde), गौतम नवलाखा (Gautam Navlakha), स्टॅन स्वामी, रमेश गैचोर, ज्योती जगताप, हॅनी बाबू, सागर गोरखे आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे.
1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचं मूळ आहे, असा पुणे पोलिसांचा आरोप आहे.
कोरेगाव-भीमामध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आठ जणांविरोधात FIR दाखल केला आहे. एएनआयने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
कोण आहेत आनंद तेलतुंबडे?
आनंद तेलतुंबडेंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ नोकरी केली व त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे. त्यांनी आयआयटी खरगपूरलाही अध्यापन केले असून ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत राहिले आहेत. सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते जाती-वर्ग, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (टीपीडीआर)चे ते सरचिटणीस आहेत. तसेच अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य आहेत.