5जी तंत्रज्ञानचा कोविड-19 च्या फैलावाशी काहीही संबंध नाही

दूरसंवाद विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिलं स्पष्टीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः 5-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे, असे दावे करून दिशाभूल करणारे अनेक संदेश विविध समाजमाज्यमांतून फिरत असल्याचे दूरसंवाद विभागाच्या लक्षात आले आहे. दूरसंवाद विभागाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, हे संदेश खोटे असून, त्यात अजिबात तथ्य नाही. 5जी तंत्रज्ञान आणि कोविड-19 चा फैलाव यामध्ये कोणताही संबंध नसल्याचं सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी सांगण्यात येत आहे, असे त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याविषयी पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीमुळे फसगत करून घेऊ नये, असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.

हेही वाचाः भयाण! गंगा किनारी साचला ४०- ४५ मृतदेहांचा ढीग

5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19 साथीचा संबंध नाही

5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19 साथीचा संबंध जोडणारे दावे पूर्णपणे खोटे असून त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्याशिवाय, अद्यापि भारतात कोठेही 5-जी नेटवर्कच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या नसल्याची माहितीही देण्यात येत आहे. अर्थात, 5-जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या किंवा त्याच्या नेटवर्कमुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा बिनबुडाचा आणि असत्य आहे.

हेही वाचाः एका दिवसात 831 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनची विक्रमी वाहतूक

नियम दहापटीने अधिक कठोर

आयनीकरण न करणाऱ्या वारंवारतांच्या रेडिओ लहरी, मोबाईलच्या मनोऱ्यांवरून उत्सर्जित होतात. त्यांच्यात अगदी सूक्ष्म विद्युतशक्ती असते आणि मानवासह कोणत्याही सजीवाच्या पेशींवर त्या कोणताही परिणाम करू शकत नाहीत. रेडिओ लहरींच्या संपर्कात येण्याच्या मर्यादांसंबंधीचे नियम दूरसंवाद विभागाने आखून दिले आहेत. या लहरींपासून संरक्षण देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयोगाने घालून दिलेल्या व जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेल्या सुरक्षा मर्यादांच्या तुलनेत हे नियम दहापटीने अधिक कठोर आहेत.

हेही वाचाः देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 49,965 कोटी रुपये जमा

दूरसंवाद विभागाने याआधी हाती घेतलेले उपक्रम

दूरसंचार सेवा पुरवठादारांकडून या नियमांचे काटेकोर पालन करून घेण्यासाठी दूरसंवाद विभागाकडे आखीवरेखीव सुरचित प्रणाली आहे. मात्र, एखाद्या मोबाइल टॉवरकडून सुरक्षा मर्यादांपलीकडे रेडिओ लहरी उत्सर्जित होत आहेत अशी कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास, तपासणीची विनंती तरंग संचार संकेतस्थळावर पाठविता येईल. त्यासाठीची लिंक- https://tarangsanchar.gov.in/emfportal मोबाइलला टॉवरकडून होणाऱ्या लहरींच्या उत्सर्जनामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनातील शंका आणि भयाचे निवारण करण्यासाठी दूरसंवाद विभागाने विविध पावलं उचलली आहेत. देशव्यापी जनजागृती कार्यक्रम, पत्रकांचे वितरण, विभागाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहितीचं प्रकाशन, वृत्तपत्रांमध्ये जाहिराती, ‘तरंग संचार’ संकेतस्थळाचा प्रारंभ इत्यादी उपायांचा यात समावेश आहे. तसंच दूरसंवाद विभागाच्या क्षेत्रीय पथकांमार्फत वेळोवेळी जनजागरण कार्यक्रम केले जातात, जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!