‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या स्वप्निल लोके यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार!

देवगड तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर, नागेश दुखंडे, महेश तेली यांनाही पुरस्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी

देवगड : देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कारांची घोषणा रविवारी झालेल्या समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल स्वप्नील लोके यांना पुरस्कार

देवगड तालुका पत्रकार समितीचे सन 2020-2021 या वर्षातील पुरस्कारांची घोषणा समितीचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर यांनी केली. यामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार (शहरी विभाग) कोकणचे महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचे देवगड प्रतिनिधी स्वप्नील यशवंत लोके यांना जाहीर झाला. पर्यटन, उद्योजकता आणि सामान्य जनतेचे प्रश्न याला प्राधान्य देत शहरी भागात अतिशय उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल लोके यांचा या पुरस्काराने सन्मान होत आहे.

बाळशास्त्री जांभेकर आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार नागेश जयवंत दुखंडे (तळेबाजार) व महेश शंकर तेली (गवाणे) यांना जाहीर झाला. यावर्षी प्रथमच विशेष सन्मान पुरस्कार देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाला जाहीर करण्यात आला आहे. उमाबाई बर्वे ग्रंथालयामार्फत गेली १० वर्ष आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. त्याप्रित्यर्थ बर्वे ग्रंथालयाचा सन्मान केला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्ष वाडेकर यांनी दिली.

या सभेस उपाध्यक्ष दयानंद मांगले, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार दिनेश साटम, सहसचिव नागेश दुखंडे, माजी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, संतोष कुलकर्णी, राजीव पडवळ, अयोध्या प्रसाद गावकर, सुरज कोयंडे, अनिल राणे, संतोष साळसकर, वैभव केळकर, गणेश आचरेकर, महेश तेली, रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!