AUTO | मारुती सुझुकीचा ग्राहकांना झटका

कार्सच्या किंमतीत केली मोठी वाढ; सर्वाधिक विकली जाणारी कार महाग झाली नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने पुन्हा एकदा किंमती वाढवल्या आहेत. वाढीव किंमती काही मॉडेल्सवर 16 एप्रिलपासून लागू होणार आहेत. मारुतीच्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत सरासरी 1.6 टक्के वाढ करण्यात आली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं आहे. मारुती सुझुकीने जास्तीत जास्त 22,500 रुपयांपर्यंत किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. पण कंपनीने आपल्या बेस्ट सेलिंग कार, स्विफ्ट आणि सेलेरिओ वगळता इतर सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

एक्स-शोरूम किंमतीवर कारची किंमत वाढविण्यात आली आहे. नवीन किंमती त्वरित लागू करण्यात आल्या आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकीच्या या हालचालीमुळे अल्टो, वॅगनआर, अर्टिगा आणि एस-प्रेसोसह इतर मॉडेल्सच्या किंमती वाढल्या आहेत. कंपनीने त्याच्या अरेना शोरूममध्ये मिळणाऱ्या जवळपास सर्व कार्सच्या किमतीं वाढवल्या आहेत.

मारुती सुझुकी इंडियाचे विक्री व विपणन कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणतात की बीएस-6चे नियम लागू झाल्यानंतर वाहनांची किंमत वाढली. याशिवाय कच्च्या मालाची किंमत विशेषतः स्टील, प्लास्टिक आणि महागड्या धातूंच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन किंमती 16 एप्रिलपासून लागू होतील.

जानेवारीत 34,000 रुपये महाग होती कार

महत्त्वाचं म्हणजे मारुती सुझुकीने चार महिन्यांत दुसऱ्यांदा किंमती वाढवल्या आहेत. यापूर्वी जानेवारी-2021ला मारुती सुझुकी इंडियाने आपल्या कारच्या किंमतीत 34,000 रुपयांपर्यंत वाढ केली होती. त्यावेळी जवळपास सर्व कंपन्यांनी आपल्या किंमतीमध्ये सरासरी वाढ केली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!