तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं गुडघे टेकले! सामना ड्रॉ, पण भारतानं मनं जिंकली

हनुमा विहारी आणि अश्विनची कडवी झुंज

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिडनी : तिसरी कसोटी ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल, असं बोललं जात होतं. पण झालं उलटच. भारतानं कडवी झुंज दिली आणि अखेर तिसरी कसोटी ड्रॉ झाली. महत्त्वाचं म्हणजे अखेरच्या दिवशी हनुमा विहारी आणि आ. अश्विनने कडवी झुंज देत क्रीजवर तळ ठोकला. ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीचा सामना या दोघांनीही यशस्वीपणे केला. ही झुंज इतकी जबदरस्त होती की ऑस्ट्रेलियानं एक ओव्हर आधीच माघार घेतली आणि तिसरी कसोटी ड्रॉ झाली.

कांगारुंची घोडचूक

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला एक चूक फारच महागात पडली. हनुमा विहारीला जीवदान मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा उठवत अखेरपर्यंत हनुमा विहारीनं खिंड लढवली. आर. अश्विनच्या मदतीनं शेवटपर्यंत झुंज देत तिसरा सामना ड्रॉ करण्यात भारताला यश आलं. त्याआधी ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र अवघ्या तीन धावांनी पंतचं शतक हुकलं. यानंतर आता पुन्हा भारत पराभूत होतो की काय अशी शंका घेतली जात होती. मात्र अखेर भारतानं तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजयी घास हिरावून घेतलाय.

पाचव्या दिवसाची सुरूवात भारतासाठी खराब झाली होती. कर्णधार अजिंक्य रहाणे फक्त ४ धावांवर बाद झाला. भारत कसोटी गमवेल की काय असं चित्र होतं. तेव्हा पंतने संघाला मोठा आधार दिला. त्याने विकेट पडू दिली नाही आणि धावा देखील आक्रमक केल्या. पंत ९७ धावांवर बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. पंत आणि पुजारा बाद झाल्यावर विहारी आणि अश्विन यांनी आश्वासक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. आता चौथ्या आणि निर्णायक कसोटीकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. तिसरी कसोटी ड्रॉ जरी झाली असली, तरी हनुमा विहारीच्या फलंदाजीनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकलीत.

मास्टरब्लास्टरनंही केलं कौतुक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.