ART & ARTIST | सिंधुपुत्राची चित्रकला ठरतेय कौतुकास्पद

उमेश देसाईचा नकाशातून चित्र साकारण्याचा प्रयत्न : गूगल'वर चित्रकलेचा नवा ट्रेड 'डूडल'

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः चित्रकाराला दैवी देणगी असते. ते देव दाखवू शकत नसले तरी देव दाखवण्याचा भास त्यांच्या कलेतून होत असतो, असं म्हटलं जातं. एवढे सामर्थ्यवान चित्रकार आपल्या आजूबाजूला आहेत. त्यापैकी उमेश देसाई यांचा उल्लेख करता येईल. दोडामार्ग तालुक्यातील केरसारख्या अत्यंत दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेतलेला उमेश खेमा देसाई याने चित्रकलेत नवा ट्रेंड आणलाय. त्याने आपल्या सर्जनशीलतेचा नमुना दाखवून दिला आहे. डूडल (doodle) असं या चित्रप्रकाराचं नाव असून त्याची कला चर्चेचा, कुतुहलाचा व कौतुकाचा विषय ठरतोय.

कोण आहे उमेश देसाई?

उमेश देसाई मूळ दोडामार्ग तालुक्यातील केर गावचा. केर गावात सातवीपर्यंत त्याचं मराठी माध्यमातून शिक्षण झालं. ग्रामीण व दुर्गम भाग असल्याने तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला. तिथे बी.कॉम. व पुढे ग्राफिक डिझायनर हा कोर्स पूर्ण केला. तो आजही आपल्या गावी प्रत्येक सणाला येत असतो. उमेश हा कार्टून नेटवर्क आणि पोगो चॅनलसाठी काम करतो. कलाकाराने काय शिक्षण घेतलं यापेक्षा त्यांच्यात क्रिएटिव्हिटी किती असते यावर त्याची गुणवत्ता दिसते. उमेश नाविन्याचा शोध घेत असतो.

नकाशावरून विविध चित्रे साकारली

सध्याच्या चित्रकारांचा विचार केला तर सध्या तैलचित्र या प्रकारात विविध चित्रकार काम करताना दिसतात. सध्या नाव किंवा गावाचं नाव यात नाविन्य शोधून वेगवेगळ्या चित्रकृती बनविल्या जातात. पण उमेशने नकाशावरून विविध चित्रं साकारलीत. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास आपण मॅप पाहतो. असाच मॅप पाहत असताना आपल्याला यातून चित्र साकारता येईल का? हा विचार त्याच्यासमोर आला. यातूनच त्याच्या ‘डुडल’ कलेने जन्म घेतला असल्याचं तो सांगतो. बहुदा अशा माध्यमातून चित्र साकारावं हा चित्रदुनियेतील पहिलाच प्रयत्न असावा, असंही तो म्हणाला.

जे पाहतो त्यात नाविन्य शोधतो

उमेश सांगतो, आपल्या सभोवताली जे काही दिसतं त्याच्यात वेगळं काहीतरी आकार शोधण्याची लहानपणापासूनच आवड होती. एकदा उबर बुक केल्यावर त्याचा मॅप बघितला आणि माझ्या डोक्यात चित्रकृती साकारण्याचा प्रयत्न सुरू झाला. सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिमा मॅपवर पाहिल्यानंतर त्यालाच आकार दिला. यात किल्ला फुंकर मारतो आणि पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात अशी कल्पना प्रत्यक्ष चित्रात साकार झाली. हे चित्र रसिकांना भावलं. त्यानंतर असा प्रयत्न सतत चालू आहे.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या अदम्य जिद्द या पुस्तकात छान संदर्भ आहे. ते म्हणतात, ‘सुंदर मनात सर्जनशीलता उमलते, ती कुठेही उमलू शकते. देशाच्या कोणत्याही भागात फुलू शकते. तिचा उगम मच्छीमाराच्या छोट्याशा खेड्यात, शेतकऱ्यांच्या घरात, डेरी फार्मवर, पशुप्रजनन केंद्रात, शाळेच्या वर्गात, प्रयोगशाळेत, उद्योगांमध्येसुद्धा सर्जनशीलता खुलू शकते!’ सर्जनशीलता म्हणजे काय, तर अस्तित्वात असलेल्या कल्पनांशी नव्या कल्पनांचं मित्रण, काहीतरी नवीन शोधून काढणं, परिवर्तन व नाविन्याचा स्वीकार करणं. हे उमेश देसाईच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं असं म्हणायला हरकत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!