पत्रिका जुळत नाही हे लग्नाचं वचन मोडण्याचं कारण असूच शकत नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; आरोपीला दिलासा न देता फटकारलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: महिलेला लग्नाचं आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले. पण लग्नाकरता पत्रिका न जुळत असल्याचं कारण देत आपलं वचन मोडलं. मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीला दिलासा न देता फटकारलं आहे. पत्रिका जुळत नाही हे लग्नाचं वचन मोडण्याचं कारण असूच शकत नाही असं म्हणत आरोपीची याचिका फेटाळली आहे. 

अर्जदाराने कुंडलीच्या ज्योतिषीय विसंगतीमुळे लग्नाचं वचन टाळलं

न्यायमूर्ती संदीप के शिंदे यांनी नमूद केले, हे स्पष्ट आहे की अर्जदाराने कुंडलीच्या ज्योतिषीय विसंगतीमुळे लग्नाचं वचन टाळलं. मात्र आरोपीचा सुरूवातीपासूनच लग्न करण्याचा कोणताही हेतू दिसत नव्हता. तसंच आपण लग्नाला नकार दिल्यास महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करेल त्यामुळे तक्रार टाळण्यासाठी आरोपीनं समुपदेशकासमोर लग्नाची तयारी दर्शवली होती. आरोपीचा हेतू प्रामाणिक आणि खरा असता तर त्याने समुपदेशकांना पत्र लिहून लग्न करणार नसल्याचं कळवलं नसतं. त्यामुळे पत्रिका जुळत नसल्यानं लग्नाचं वचन मोडलं हा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टानं सत्र न्यायालयानं दिलेले आदेश कायम ठेवत याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.

प्रकरण काय?

2012 पासून हे जोडपे रिलेशनशिपमध्ये होतं आणि त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर महिलेने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं आणि नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिचं भावनिक आणि मानसिक शोषण केलं.

ऑक्टोबर 2012 मध्ये हॉटेल कॅफेटेरियामध्ये दोनदा शारीरिक संबंध आले. नंतर दोघांनी एकत्र प्रवासही केला. मात्र, जेव्हा ती महिला गर्भवती झाली, तेव्हा त्या पुरुषाने तिला गर्भपात करण्यास सांगितलं. आणि दोन वर्षांनंतर तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. जेव्हा महिलेने तिच्या कुटुंबाला त्या पुरुषाबद्दल सांगितलं, तेव्हा तिला तिच्या घरातून हाकलून देण्यात आलं आणि पुरुषाने तिच्याशी लग्न करण्यासही नकार दिला.

डिसेंबर 2012 मध्ये, महिलेने पुरुषाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी लग्नाला सहमती दर्शविली. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने जानेवारी 2013 मध्ये आपली तक्रार मागे घेतली. दोन आठवड्यांनंतर, त्या व्यक्तीने वयाच्या 24 व्या वर्षी लग्न करण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचं सांगून पुन्हा लग्नास नकार दिला. तो म्हणाला की त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सशक्त नाही. यानंतर, महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचा त्या व्यक्तीबद्दल गुन्हा नोंदवला.

यानंतर त्या व्यक्तीने या प्रकरणातून मुक्त होण्यासाठी याचिका दाखल केली जी दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फेरविचार दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिंदे यांनी निरीक्षण केलं की, सुरुवातीपासून पुरूषाने असं सूचित केलं आहे की त्या महिलेशी लग्न करण्याचं वचन पाळण्याचा पुरुषाचा कोणताही हेतू नव्हता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!