वैद्यकीय व्यावसायिकांना आता क्षमतेवर आधारित शिक्षण

Goan Varta Live | प्रतिनिधी
बेळगाव : जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाने के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (केएएचईआर) यांच्या नेतृत्वाखाली अॅडव्हान्स सिम्युलेशन सेंटर अँड क्लिनिकल स्किल्स लॅब सुरू केला आहे.
कधी होणार उद्घाटन?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत आज १७ जानेवारीला या केंद्राचं उद्घाटन करणार आहेत. हे केंद्र रुग्णांच्या सुरक्षेला प्रोत्साहन देणाऱ्या जोखीम मुक्त शिक्षणाद्वारे वैद्यकीय व्यावसायिकांना क्षमतेवर आधारित सिम्युलेशन शिक्षण देईल.
केएएचईचे चान्सलर डॉ. कोरे सांगतात…
अॅडव्हान्स सिम्युलेशन सेंटर अँड क्लिनिकल स्किल्स लॅबमध्ये वैद्यकीय विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींना गंभीर आजारी रुग्णांचे निदान, आपत्कालीन सेवा, गुंतागुंतीच्या परिस्थितीतही प्रसूती करणं, शस्त्रक्रिया करणं, कॅथेटरायझेशनसारख्या प्रक्रिया, यासारख्या रुग्णसेवा कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. रुग्णांवर सुरक्षितपणे उपचार करण्यासाठी ते पुरेसं कौशल्य आत्मसात करू शकतील. यामुळे यूजी आणि पीजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अध्यापन आणि प्रशिक्षण तर मिळेलच, शिवाय डॉक्टरांना त्यांचं कौशल्य आत्मसात करण्यासही मदत होईल. या क्षेत्रातील एक अद्वितीय केंद्र म्हणजे सर्वात प्रगत वैद्यकीय सिम्युलेटर्स आणि स्किल ट्रेनर्स, जे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात शिकण्याची संधी उपलब्ध करून देतात. या केंद्रामुळे प्रशिक्षणार्थींना दर्जेदार आरोग्यसेवा सुधारण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धती अनुभवण्याची एक अनोखी संधी मिळेल. आठ हजार चौरस फुटांवर पसरलेलं हे केंद्र भविष्यातील विस्ताराची तरतूद असलेल्या आयसीयू, ओटी आणि ओपीडीमध्ये विभागलं गेलंय.
या केंद्रात वैद्यकीय, नर्सिंग, बायोमेडिकल, आयटी आणि संलग्न विज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षित प्राध्यापक आहेत जे अध्यापन प्रक्रियेत सहभागी होतील. डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरू डॉ. विवेक साओजी यांची समिती या केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी निवड करण्यात आली आहे.