तेलंगणामध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला

मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा; तेलंगाणातील हैदराबादच्या सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने मुलीशी मैत्री केली होती.  मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल नऊ विशेष टीम फरार आरो्पीचा शोध घेत होत्या. आरोपीची ओळख पटवणं सोपं व्हावं, यासाठी हैदराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली होती.

आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस..

तसेच बुधवारी जारी केलेल्या निवेदनात हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जाहीर केलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!