भीषण अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

गुजरातमधील एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

तारापूर : गुजरातमध्ये एका भीषण अपघातात अख्खं कुटुंब उध्वस्त झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झालाय. आणंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर हा भीषण अपघात झाला.

कारचा चक्काचूर, दहाजणही जागीच ठार

सूरत येथून भावनगरच्या दिशेनं आपल्या मारुती इको कारमधून निघालेल्या एकाच कुटुंबातील दहाजणांना आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय याचा पत्ता नव्हता. तारापूर हायवेवरून कार भरधाव निघाली होती. सोबतीला गप्पागोष्टी आणि थट्टामस्करी सुरू होती. कार इंद्रनज गावाजवळ पोचली असता, समोरून येणारा भरधाव ट्रक दिसला. काही क्षणांतच दोन्ही भरधाव वाहनांची जबरदस्त टक्कर झाली. कार चक्काचूर होऊन अक्षरश: ट्रकच्या पुढील भागात घुसली. आतील दहाजणही जागीच ठार झाले.

मृतांत दोन महिला, सात पुरुष, लहान मुलाचा समावेश

अपघाताचं स्वरुप इतकं भीषण होतं की, मृतांचे शव एकमेकांवर पडले होते. मृतांत दोन महिला, सात पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हा ट्रक मध्यप्रदेशमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंचनामा करून सर्व मृतदेह तारापूर रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!