ACCIDENT | टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: अस्थी विसर्जन केल्यानंतर गावी निघालेला टेम्पो रस्त्यात थांबला असताना अर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हा अपघात झाला. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

नाशिक येथे अस्थी विसर्जन केल्यानंतर औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथे जाण्यासाठी निघालेला टेम्पो येवल्यात उभा असताना अर्टिगा कारने मागून येऊन जोरदार धडक दिली. आधीच नातेवाईकाच्या निधनाचा धक्का पचवणाऱ्या कुटुंबाला अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथील दहा ते बारा जण हे टेम्पोने नाशिक येथे आपल्या नातेवाईकाच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी रामकुंडावर गेले होते. अस्थिविसर्जन करुन परत आपल्या गावी जाण्यासाठी ते टेम्पोने निघाले होते.

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला धडक

गाडीतील खाण्यापिण्याच्या वस्तू संपल्याने काहीतरी घेण्यासाठी रात्री 9 वाजताच्या सुमारास टेम्पो येवला शहरातील मालेगांव-नगर राज्य मार्गावर रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. रस्त्यात खड्डे असल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटून भरधाव वेगातील Mh 02 CV 4332 क्रमांकाची अर्टिगा कार उभ्या असलेल्या MH 04 CP 7403 क्रमांकाच्या टेम्पोवर आदळली.

तीन ते चार जण किरकोळ जखमी

यावेळी टेम्पोतील तीन ते चार जण हे रस्त्यावर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करुन सर्व जण हे आपल्या गावी चिंचखेड येथे निघून गेले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

व्हि़डिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!