अभिमानास्पद! बुद्धिबळातील ‘युवा ग्रँडमास्टर’

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्लीः भारताचा अमेरिकास्थित बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा याने बुधवारी हंगेरीतील बुडापेस्ट येथे ग्रँडमास्टरसाठीचा तिसरा टप्पा पार करत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. अभिमन्यूने ग्रँडमास्टर सर्जी कार्याकिन यांचा गेली १९ वर्षं अबाधित असलेला विक्रम मोडला.
१२ वर्षं, चार महिने आणि २५ दिवसांचा असताना मिळवला ग्रॅंडमास्टर किताब
१२ ऑगस्ट २००२मध्ये कार्याकिन यांनी १२ वर्षं आणि सात महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. ५ फेब्रुवारी २००९ मध्ये जन्मलेल्या अभिमन्यूने १२ वर्षं, चार महिने आणि २५ दिवसांचा असताना ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली आहे, असं ‘चेसडॉटकॉम’ या संकेतस्थळाने म्हटलं आहे.

ग्रँडमास्टर किताबासाठीचा २५०० एलो रेटिंगचा स्पर्धेतील टप्पा केला पार
१२ वर्षीय अभिमन्यू अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहात असून त्याने आंतरराष्ट्रीय मास्टरपासून थेट ग्रँडमास्टर किताबापर्यंत झेप घेतली आहे. ग्रँडमास्टर किताबासाठीचा २५०० एलो रेटिंगचा टप्पा त्याने या स्पर्धेत पार केला. अभिमन्यूने बुडापेस्ट येथे काही महिने वास्तव्य करत लागोपाठ स्पर्धामध्ये भाग घेतला. त्याने या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करत ग्रँडमास्टर किताब आणि विक्रमाची नोंद केली.
कार्याकिनचा विक्रम १९ वर्षांनी मोडीत
करोनाच्या साथीमुळे १४ महिने माझं बुद्धिबळ स्थगित होतं. पण या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला मी ‘चेकमेट’ करण्यात यशस्वी ठरलो. आता विश्वचषकात चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहे, असं अभिमन्यू मिश्रा सांगतो.
हा विक्रमी टप्पा गाठल्याबद्दल अभिमन्यूचं अभिनंदन.